मनात शिकण्याची दृढ इच्छा असेल तर कितीही अडचणी असल्या तरी त्यावर मात करुन यश मिळवता येते. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाने हे सिद्ध करुन दाखवले आहे. राजस्थानच्या राजमल मीनाने जवाहरलाल नेहरु विद्यापीठात पहिले पाऊल ठेवले ते सुरक्षा रक्षक म्हणून. राजमल मीना २०१४ साली जेएनयूमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाला. त्यावेळी एकदिवस या विद्यापीठात आपण विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळवू असे त्याला वाटले नव्हते. आज राजमल मीनाने त्याच जवाहरलाल नेहरु विद्यापीठात प्रवेश मिळवला आहे.

मागच्याच आठवडयात ३४ वर्षीय राजमल मीना जेएनयूची प्रवेश परीक्षा पास झाला व बीए रशियन हॉनर्सच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवला. तुमची सामाजिक पार्श्वभूमी कुठली का असेना त्याने जेएनयूमध्ये काही फरक पडत नाही. हेच जेएनयूचे वेगळेपण आहे. इथले शिक्षक, विद्यार्थ्यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले. आता ते मला शुभेच्छा देत आहे. मी एकारात्रीत प्रसिद्ध झालोय असे मला वाटते अशी भावना राजमल मीनाने व्यक्त केली.

राजमल मीनाचे वडिल दैनंदिन रोजंदारीवर काम करायचे. भाजेरा गावातील सरकारी शाळेमध्ये त्याने हायस्कूलपर्यंतचे शिक्षण घेतले. जवळचे कॉलेज घरापासून २८ ते ३० किलोमीटर अंतरावर होते असे राजमलने सांगितले. परिस्थिती खडतर होती पण शिक्षणाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. मागच्यावर्षी राजस्थान मुक्त विद्यापीठातून राजमलने पॉलिटिकल सायन्स, इतिहास आणि हिंदी विषयातून ग्रॅज्युएशनची पदवी घेतली.

मीनाचे लग्न झाले असून त्याला तीन मुली आहेत. मुनीरका येथे छोटयाशा खोलीत तो राहतो. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाहीय याची मनात खंत होती. जेव्हा जेएनयूमधले शैक्षणिक वातावरण अनुभवले तेव्हा शिक्षणाचे स्वप्न पूनर्जिवीत झाले असे मीनाने सांगितले. डयुटीच्या तासांमध्ये तसेच त्यानंतर राजमल मीना प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. फोनमधील अॅप्सवरुन पेपर वाचायचो. पीडीएफ नोटससाठी विद्यार्थी मला मदत करायचे. परदेशी भाषांमध्ये शिकणाऱ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळते त्यामुळे त्याने परदेशी विषयाची निवड केली आहे.