अरविंद केजरीवाल यांचा आरोप

नवी दिल्ली : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात दिल्ली पोलीस अत्यंत सक्षम आहेत, मात्र त्यांना कोणतीही कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेण्यास सांगण्यात आले होते, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी जेएनयू आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भाने केला.

विद्यापीठांमधील हिंसाचार थांबविला नाही त्यामध्ये दिल्ली पोलिसांचा दोष नाही कारण त्यांना देण्यात आलेल्या आदेशांचे त्यांनी पालन केले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तुम्हाला काहीही करावयाचे नाही असे आदेश जर दिल्ली पोलिसांना देण्यात आले असतील तर दिल्ली पोलीस तरी काय करणार, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

भाजपशासित दिल्ली महापालिका आणि दिल्ली सरकारच्या कारभाराची तुलना करणाऱ्या अहवालाचे केजरीवाल यांनी सादरीकरण केले तेव्हा ते बोलत होते. आम्ही जेव्हा सत्तेत आलो तेव्हा रुग्णालये आणि शाळांची अवस्था वाईट होती. मात्र डॉक्टर आणि शिक्षक सक्षम असल्याने आम्ही त्यांना बदलले नाही, राजकीय इच्छाशक्ती गरजेची आहे, हिंसाचार थांबविण्याचा प्रयत्न करू नका, असे आदेश वरूनच देण्यात आल्याने त्यांना आदेशांचे पालन करावे लागले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.