वॉशिंग्टन : मतमोजणीत पिछाडीवर पडमूनही अखेपर्यंत रडीचा डाव खेळणारे विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना चीतपट करून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्याबाबतचे वृत्त अमेरिकेतील वृत्तवाहिन्यांनी दिले. पेनसिल्वेनियातील २० निर्णायक प्रातिनिधिक मतांच्या जोरावर शनिवारी रात्री बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आले.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले. बायडेन यांना २७३, तर ट्रम्प यांना २१४ मते पडली. बायडेन यांना ५०.५ टक्के म्हणजे ७४४७८३४५ मते, तर ट्रम्प यांना ४७.७ टक्के म्हणजे ७०३२९९७० मते मिळाली आहेत. पेनसिल्वेनियात अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले.  तेथील २० प्रातिनिधिक मते त्यांनी मिळविली. नॉर्थ कॅरोलिनात ट्रम्प, तर अ‍ॅरिझोना, नेवाडात बायडेन यांनी विजय मिळविला.

अमेरिकी माध्यमांनी बायडेन विजयी झाल्याचे पेनसिल्वेनियातील निकालानंतर जाहीर केले. आता बायडेन यांना २७३ मते मिळाली असून या मतांबाबत वेगवेगळे अंदाज करण्यात आले आहेत. काही संस्थांच्या मते २७९ विरुद्ध २१४ अशी स्थिती आहे.

कमला हॅरिस यांनी इतिहास घडवला

लोकप्रतिनिधी (सेनेटर) कमला हॅरिस यांनी इतिहास घडवला आहे. त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या आहेत. त्याचबरोबर त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी उपाध्यक्ष आहेत. बायडेन आणि हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारीला होणार आहे.

दरम्यान, पेनसिल्वेनिया, अ‍ॅरिझोना, नेवाडा, जॉर्जिया येथे उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. बायडेन यांना चारही राज्यांत निर्णायक आघाडी आहे. पेनसिल्वेनियातील विजयानंतर त्यांनी २७० चा जादुई आकडा  ओलांडला.

ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत निकालात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. किमान १० कोटी लोकांनी आधीच मतदान केले असल्याने तेथेच बायडेन जिंकल्याचे स्पष्ट झाले होते. कारण अमेरिकेतील प्रशासकीय पातळीवरील अस्वस्थतेमुळे व ट्रम्प यांच्या लहरी कारभाराने मतदार कंटाळले होते. पोलिसांनी कृष्णवर्णीयांवर केलेल्या अत्याचारामुळे दंगली उसळल्या होत्या. त्यामुळे कृष्णवर्णीयांची मते ट्रम्प यांच्या विरोधात गेली. त्याशिवाय डेमोक्रॅटिक पक्षाने उपाध्यक्षपदासाठी कृष्णवर्णीय कमला हॅरिस यांना उमेदवारी देऊन मोठी खेळी केली, तिला यश आले.

पेनसिल्वेनियातील विजयाने बायडेन यांनी २७० चा बहुमताचा आकडा ओलांडला. ट्रम्प यांच्यावर त्यांनी ४० लाखांहून अधिक मतांनी विजय संपादन केला. एकीकडे करोना काळातील ट्रम्प यांचे बेजबाबदार वर्तन, तर दुसरीकडे बायडेन यांचे संयमी आणि जबाबदार वर्तन यात अमेरिकेने बायडेन यांची निवड केली.

उत्तरेकडील औद्योगिक राज्यात चार वर्षांपूर्वी ट्रम्प विजयी झाले होते. तेथे बायडेन यांनी बाजी मारली. मिशीगन, विस्कॉन्सिन, पेनसिल्वेनिया या राज्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

हा अमेरिकेच्या एकजुटीचा काळ आहे. पूर्वीच्या जखमा आता भरतील. आता आपण खऱ्या अर्थाने ‘युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ आहोत. 

– जोसेफ आर. बायडेन, नियोजित अध्यक्ष, अमेरिका

ही निवडणूक जो बायडेन या व्यक्तीपुरती नव्हती, तर ती अमेरिकेच्या मूलतत्वांच्या रक्षणाची होती. त्यासाठी लढण्याची इच्छा दाखवण्याबाबतची होती. पुढील काम कठीण असले तरी आम्ही ते करू.

– कमला हॅरिस, नियोजित उपाध्यक्ष