मला काहीही समजायच्या आतच माझे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर पसरले. या घटनेमुळे मला लोकांच्या टीकेचा भडिमार सहन करावा लागला. लोक माझ्या त्या फोटोंवरून सातत्याने शेरेबाजी करत होते. तो एक बनावट ट्विट होता त्यात माझा मॉर्फ करण्यात आलेला फोटो वापरण्यात आला होता असे राणा अय्यूब या मुक्त पत्रकाराने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. राणा अय्यूब ही मुक्त पत्रकार तिच्या परखड आणि आक्रमक लेखांसाठी ओळखली जाते. सत्ताधाऱ्यांविरोधात तिची लेखणी तलावारीप्रमाणे चालते. मात्र याच मुक्त पत्रकाराची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्याबद्दल बोलताना हे सगळे माझ्यासाठी अनपेक्षित होते असे राणा अय्यूबने म्हटले आहे. हे फोटो इतक्या वेगाने पसरले की त्याची मला कल्पना येण्याधीच ते व्हायरल झाले होते. माझ्या सरकारविरोधी लिखाणामुळेच मला हे सहन करावे लागले असेही तिने म्हटले आहे.

मला अनेकांनी या मॉर्फ फोटोंचे रिट्विट पाठवले. ‘तुझ्यावर बलात्कार करावासा वाटतो’ इतक्या खालच्या भाषेत प्रतिक्रियाही लिहून पाठवल्या. तसेच मला जीवे मारण्याच्या धमक्याही येऊ लागल्या. मला तुला निराश करायचे नाही पण तुला मी असे काही मेसेजेस पाठवतो आहे ज्यामुळे तू निराश होऊ शकतेस असे मला मित्र सांगायचे तेव्हा मला काय प्रतिक्रिया देऊ ते समजायचेच नाही असेही राणा अय्यूबने म्हटले आहे. ते मित्र मला त्यांना त्यांच्या फोनवर आलेले माझे मॉर्फ अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवत. त्यानंतर तर कहरच झाला, I am available या मेसेजसह माझे ट्विटर हँडल व्हायरल झाले त्यामध्ये माझा मोबाईल क्रमांक आणि पत्ताही होता. त्यानंतर लोक मला फोन करून ‘रेट’ विचारू लागले. गेल्या काही आठवड्यात मी मानसिक दृष्ट्या नरकयातना काय आहेत याचा अनुभव घेतला आहे. पोर्नोग्राफीतले व्हिडिओही माझ्या फोटो आणि व्हिडिओजसोबत जोडले गेले. एखादी व्यक्ती माझा शत्रू असेल तर त्या व्यक्तीलाही इतका भयंकर अनुभव येऊ नये अशी मी प्रार्थना करते असेही राणाने म्हटले आहे.

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार राणा अय्यूबला संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा असे यूएनने म्हटले आहे. मात्र एवढे सगळे घडूनही मला एकाही सरकारी अधिकाऱ्याचा साधा फोनही आला नाही. मला काय यातना सहन कराव्या लागल्या? माझ्या सुरक्षेचे काय याची चिंता कोणालाही नाही. एकही सरकारी अधिकारी किंवा प्रतिनिधी मला पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नाही.

कोण आहे राणा अय्यूब?

राणा अय्यूब ही एक भारतीय पत्रकार आहे. तहलकासाठी तिने काम केले असून आता ती एक मुक्त पत्रकार आहे. तहलकाचा मुख्य संपादक तरूण तेजपाल याच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राणा अय्यूबने तहलका सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात तिने परखड लेखन केले आहे. गुजरात मध्ये झालेल्या बनावट चकमकींबाबत राणा अय्यूबने लिहिलेले लेख हे तिच्या शोध पत्रकारितेतून समोर आले होते आणि जगभरात गाजले. २०१० मध्ये मी जी शोध पत्रकारिता केली त्यामुळे अमित शाह यांना तुरुंगात पाठवू शकले हे मी माझे यश मानते असेही त्यांनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरात दंगलीसंदर्भात स्टिंग ऑपरेशन केले होते. राणा अय्यूबने नरेंद्र मोदी यांचेही स्टिंग ऑपरेशन केले होते.  तसेच तिने अनेक अधिकाऱ्यांचेही स्टिंग ऑपरेशन केले होते. मुस्लिमांना आम्ही कसे ठार केले याच्या शौर्यकथा मला सांगितल्या गेल्या असेही तिने सांगितले.

तिच्या या परखड आणि सरकारविरोधी भूमिकेमुळे अनेकांनी तिच्यावर टीका केली. काही आठवड्यांपूर्वी तिचे मॉर्फ फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र हा सगळा अनुभव माझ्यासाठी नरक यातना देणारा होता असे तिने म्हटले आहे.