आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून पत्रकार हेल्मेट घालून भाजपा नेत्यांच्या भेटीला गेले आणि मग हेल्मेट घालूनच त्यांना प्रश्न विचारण्यात आले. छत्तीसगढमधल्या रायपूरमध्ये हा प्रकार घडला आहे. ज्या पत्रकारांकडे बुम माईक होता ते सगळेजण आणि कॅमेरामन हेल्मेट घालून भाजपा नेत्यांची मुलाखत घेताना दिसत होते. २ फेब्रुवारीला सुमन पांडे या पत्रकारावर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात या पत्रकाराच्या डोक्याला दुखापत झाली. याच प्रकाराचा निषेध म्हणून पत्रकारांनी हेल्मेट घालून भाजपा नेत्यांच्या मुलाखती केल्या.

सुमन पांडे या पत्रकाराने विचारलेले काही प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांना रुचले नाहीत. त्यामुळे त्यांनी या पत्रकारावर हल्ला चढवला. त्याला बेदम मारहाणही केली. या मारहाणीत सुमन पांडेच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सुमन पांडेला त्याच्या कॅमेरात असलेले फुटेज डिलिट करण्यास सांगितले होते, मात्र सुमन पांडेने तसे करण्यास नकार दिल्यानेही त्याला मारहाण करण्यात आली. हा प्रकार समजताच इतर पत्रकारांनी पोलीस ठाणे गाठून भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार केली. तसेच ज्या भाजपा कार्यकर्त्यांनी सुमन पांडेला मारहाण केली त्या कार्यकर्त्यांना अटक करा अशी मागणी केली. त्यासाठी आंदोलनही केले. ज्यानंतर पोलिसांनी चार भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली. सुमन पांडे हा एनडीटीव्हीचा पत्रकार आहे, त्याला मारहाण करण्यात आली.

मात्र या सगळ्या प्रकाराचा निषेध म्हणून बुधवारी सगळ्याच पत्रकारांनी हेल्मेट घालून वार्तांकन केले. भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते काय वागतील याचा भरवसा नाही असं म्हणत आमच्या सुरक्षेसाठी आम्ही हेल्मेट घातल्याचे या पत्रकारांनी सांगितले.