पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद शहरात कडेकोट बंदोबस्त असलेल्या न्यायालयात आत्मघाती हल्ला होऊन त्यात एक न्यायाधीश व काही वकिलांसह ११ जण ठार झाले आहेत. या आत्मघाती हल्ल्यात हातबॉम्बचा वापर करीत बेछूट गोळीबारही करण्यात आला. अज्ञात हल्लेखोर न्यायालयाच्या संकुलात आले व त्यांनी गोळीबार केला. त्यात अकरा जण ठार झाले असून त्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश रफाकत अहमद खान अवान व इतर अनेक वकीलही मरण पावले.  इतर २५ जण जखमी झाले आहेत.
एफ-८ संकुलात हा हल्ला झाला, हल्लेखोरांची संख्या नेमकी किती होती हे समजू शकले नाही, पण दोन हल्लेखोरांनी त्यांना घेरले असता स्वत:ला उडवून दिले, असे इस्लामाबादच्या पोलीस प्रमुखांनी सांगितले.
पोलीस महानिरीक्षक सिकंदर हयात म्हणाले की, दोन बंदुकधाऱ्यांनी स्वत:ला उडवून दिले. एकूण ११ जण ठार तर २५ जण जखमी झाले आहेत, त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. मरण पावलेल्यात तरूण वकिलांची संख्या जास्त आहे. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी सांगितले की, दोन बंदुकधारी न्यायालयाच्या आवारात घुसले व त्यांनी दोन हातबॉम्ब फेकले व नंतर रायफलीतून गोळीबार केला, सुमारे पंधरा मिनिटे त्यांचा गोळीबार सुरू होता, अंतर्गत सुरक्षा मंत्री चौधरी निसार अली खान यांनी इस्लामाबाद हे सुरक्षित शहर असल्याचे सांगितल्यानंतर काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. इस्लामाबादेत बऱ्याच कालावधीनंतर एवढा मोठा हल्ला झाला आहे. तेहरीक ए तालिबान पाकिस्तानचा प्रवक्ता शाहीदुल्ला शाहीद याने दोनच दिवसांपूर्वी शस्त्रसंधी जाहीर केला होता, पण त्याने आपला गट या हल्ल्यात सामील नसल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचे सरन्यायाधीश तसदुक हुसेन जिलानी यांनी या हल्ल्याची दखल घेतली असून तीन सदस्यांचे पथक या हल्ल्याबाबतची सुनावणी उद्या करणार आहे.
अंतर्गत सुरक्षा सचिव व इस्लामाबादचे मुख्य आयुक्त व पोलीस प्रमुख या सुनावणीवेळी उपस्थित राहणार आहेत.