उमर खलिद आणि अनिर्बन भट्टाचार्य अद्यापही न्यायालयीन कोठडीत

दिल्ली उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार याने गुरुवारी देशद्रोहाच्या आरोपप्रकरणी जातमुचलका सादर केल्यानंतर त्याची तिहार कारागृहातून गुरुवारी सुटका करण्यात आली.

न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर कन्हैयाला तिहार कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याने पोलीस ठाण्यातील तात्पुरत्या न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर जातमुचलका सादर केला. दंडाधिकाऱ्यांनी जातमुचलक्याचा स्वीकार करून त्याची कारागृहातून सुटका करण्याचे आदेश दिले.

उच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या आदेशानुसार, कन्हैयाकुमारने १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तितक्याच रकमेची हमी सादर केली. जेएनयूचे सदस्य प्रा. एस. एन. मालकर यांनी कन्हैयाकुमारसाठी हमी दिली. कन्हैयाकुमार याच्यासमवेत अटक करण्यात आलेले अन्य दोन विद्यार्थी उमर खलिद आणि अनिर्बन भट्टाचार्य अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत.

चकमकींच्या भीतीमुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था

कन्हैयाकुमारची सुटका झाल्यानंतर चकमकी होण्याची शक्यता गृहीत धरून दिल्ली पोलिसांनी सर्व ठाण्यांना, वाहतूक पोलिसांना कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठ संकुलात विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. कन्हैयाकुमारची सुटका झाल्यानंतर तो जंतरमंतर, जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठ आदी ठिकाणी समर्थक विद्यार्थ्यांसह भेट देण्याची शक्यता आहे. या प्रकारांना अभाविप आणि अन्य उजव्या संघटना आणि राजकीय नेत्यांकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने तेथे चकमक झडण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

(((   कन्हैयाकुमार  ))