केरळमधील कन्नूर येथील तिहेरी हत्याकांडाचे गुढ उकलण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने एका महिलेने तिची मुलगी व आई- वडिलांची हत्या केली. जेवणातून विष देऊन तिने या तिन्ही हत्या केल्या होत्या.

जानेवारीमध्ये कन्नूर जिल्ह्यात नऊ वर्षांची मुलगी ऐश्वर्याचा संशयास्पद मृत्यू झाला. मुलीला विषबाधा झाल्याचे समोर आले होते. यानंतर तीन महिन्यात मुलीच्या आजी- आजोबांचाही तशाच पद्धतीने मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावात चर्चा सुरु झाल्या. अनेकांना भूतबाधा किंवा काळ्या जादूचा प्रकार वाटला. या प्रकरणाची केरळच्या मुख्यमंत्र्यांनाही दखल घ्यावी लागली आणि त्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी शिताफीने तपास करत या हत्याकांडाचा उलगडा केला.

पोलिसांनी सौम्या या महिलेला अटक केली आहे. सौम्याचे गावातील अनेक पुरुषांशी अनैतिक संबंध होते. जानेवारीमध्ये सौम्याची नऊ वर्षांची मुलगी ऐश्वर्याने आईला एका तरुणासोबत अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले होते. तिने हा प्रकार आजी- आजोबांनाही सांगितला होता. यामुळेच सौम्याने तिघांच्या हत्येचा कट रचला.

२१ जानेवारी रोजी सौम्याने तिच्या मुलीला जेवणातून उंदीर मारण्याचे विष दिले. यामुळे मुलीची प्रकृती खालावली व दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. विहिरीतील पाण्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा दावा सौम्याने त्यावेळी केला. यानंतर ४० दिवसांनी सौम्याने तिची आई कमला (वय ५४) यांना देखील विष दिले. कमला यांचा देखील रुग्णालयात मृत्यू झाला. तर १३ एप्रिल रोजी तिने वडील कुंजीकन्नान यांना देखील विष दिले. त्यांचा देखील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिन्ही मृत्यूच्या वेळी सौम्याने गावातील विहिरीचे पाणी दुषित झाल्याचा आरोप केला होता. कळस म्हणजे, तिच्यावर संशय येऊ नये म्हणून मुलीच्या मृत्यूच्या वेळी तिने चक्कर येऊन पडल्याचा दिखावा केला. तर वडीलांच्या मृत्यूनंतर ती स्वत:देखील रुग्णालयात भरती झाली.  वडिलांप्रमाणेच माझी देखील अवस्था झाल्याचे, असे तिने सांगितले होते.

दुसरीकडे पोलिसांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने परिसरातील ४० विहिरींमधील पाण्याचे नमुने गोळा केले होते. विहिरीचे पाणी दुषित नसल्याचे यात निष्पन्न झाले. तसेच पोलिसांनी तिन्ही मृतदेहाचा व्हिसेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला. यात विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. अखेर संशयाची सुई सौम्याकडेच वळली. १० तास कसून चौकशी केल्यानंतर सौम्याने अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने तिघांची हत्या केल्याची कबुली दिली. न्यायालयाने सौम्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या हत्यांमध्ये तिला आणखी कोणी साथ दिली होती का, याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.