पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील शाब्दिक हल्ल्यांमुळे कर्नाटकातील प्रचारात आता चांगलीच रंगत आली आहे. आव्हाने-प्रतिआव्हानांमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही उडी घेतली आहे. भाजपाचे स्टार प्रचारक असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वांत जुन्या पक्षासाठी कर्नाटक हे एटीएम असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. कर्नाटकाला काँग्रेसपासून मुक्त करण्याची सध्या गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. राम मंदिरबाबत ते म्हणाले की, हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. हा जमिनीशी निगडीत खटला आहे. सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण पाहत असून थोडी सहनशीलता बाळगाण्याची गरज आहे. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यसरकारचा विषय आहे. आता राम मंदिरचा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे, हीच मोठी गोष्ट आहे. सुनावणी सुरू आहे, त्यातून चांगलेच बाहेर पडेल. जन भावनेचा सन्मान झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कर्नाटकमध्ये भाजपाचेच सरकार सत्तेवर येईल आणि कर्नाटकात सुशासन आणि विकास दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री होईल असा मी कधीच विचार केला नव्हता. यासाठी पंतप्रधान आणि अमित शाह यांचा मी खूप आभारी आहे. आता माझी जबाबदारी आहे. कठोर कष्ट आणि समर्पण भावना याला कुठलाच पर्याय नाही. पंतप्रधान मोदी हे माझे ‘रोल मॉडेल’ आहेत. मला प्रशासकीय अनुभव काहीच नव्हता. पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील काम करण्याची त्यांची पद्धतच मी उत्तर प्रदेशमध्ये वापरत आहे. प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची पद्धत असते. मी माझ्या मंत्र्यांना स्वातंत्र्य दिले आहे. दर १५ दिवसांनी मी आढावा घेतो. त्यांच्याशी बैठकही घेतो, अशी माहिती त्यांनी दिली.