पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून (दि.१ मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली आहे. कर्नाटकातील चामराजनगरमधील संथारामहळ्ळी येथी प्रचारसभेत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती शब्दांत टीका केली. गेल्या काही दिवसांपासून राहुल यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेत काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणावर टीका केली. राहुल गांधी यांनी १५ मिनिटांचे दिलेले आव्हान स्वीकारत प्रचारात कागद न पाहता १५ मिनिटे राज्य सरकारच्या यशाबाबत माहिती देण्याचे आव्हान त्यांनी दिले. आपल्या भाषणात काय म्हणाले पंतप्रधान मोदी जाणून घेऊयात…

राहुल गांधींनी कागदाशिवाय १५ मिनिटं बोलून दाखवावं, पंतप्रधान मोदींचे आव्हान

– कर्नाटकमध्ये भाजपाचा हवा नाही तर वादळ सुरू आहे. कर्नाटकात बदलाची लाट सुरू आहे.
– आमच्या सरकारने देशातील १८ हजार गावांमध्ये वीज पोहोचवली आहे. २८ एप्रिलचा दिवस देशाच्या इतिहासात नेहमी लक्षात ठेवला जाईल. मणिपूरच्या लिसान गावात वीज पोहोचताच देशातील सर्व गावात वीज पोहोचवण्याचे काम पूर्ण झाले आहे.
– काँग्रेसचे अध्यक्ष अति उत्साहात कधी कधी मर्यादेचे उल्लंघन करतात. कामगार दिनी १८ हजार गावात वीज घेऊन जाणाऱ्यांबाबत एखादा शब्द त्यांनी बोलला असता तर चांगले झाले असते. पण ते आता नामदार आहेत कामदार नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
– जिथे काँग्रेस असते तिथे गुन्हे, भ्रष्टाचार, नात्यागोत्याचाच बोलबाला असतो. विकासाचा मार्गच बंद होतो.
– काँग्रेसचे नेतृत्व अशा लोकांच्या हाती आहे, ज्यांना देश, इतिहास, महापुरूष आणि वंदे मातरमचेही ज्ञान नाही.
– मागील ५ वर्षांत कर्नाटकमध्ये कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. इथे कोणताच व्यक्ती सुरक्षित नाही. ना लॉ आहे ना ऑर्डर आहे. इथे तर लोकायुक्तही सुरक्षित नाहीत.