माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे पुत्र आणि जनता दल सेक्यूलर पक्षाचे नेते एच डी कुमारस्वामी यांना काँग्रेसने कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. रामनगर व चिन्नापट्टणम या दोन मतदारसंघांमधून ते निवडून आले आहेत. कुमारस्वामी यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा…

एच डी कुमारस्वामी यांचा जन्म १६ डिसेंबर १९५९ रोजी झाला. त्यांना वडील देवेगौडा यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळाला. फेब्रुवारी २००६ ते ऑक्टोबर २००७ या कालावधीत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. २००४ मधील निवडणुकीत काँग्रेसने सुमार कामगिरी केली होती. त्यांना फक्त ६५ जागांवर विजय मिळाला होता. तर जनता दल संयुक्त या पक्षाने ५८ जागांवर विजय मिळवला होता. देवेगौडा यांनी धरमसिंह यांना पाठिंबा दिला आणि त्याकाळी देवेगौडांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सिद्धरामय्या यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. पण २४५ दिवसांनी देवेगौडा यांना त्यांच्याच मुलाने म्हणजेच कुमारस्वामींनी दणका दिला. कुमारस्वामींनी भाजपाच्या येडियुरप्पा यांच्याशी हात मिळवणी केली आणि ते कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. २०- २० महिने मुख्यमंत्रीपद विभागून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

देवेगौडा यांच्याशी दुरावा

कुमारस्वामींनी भाजपाशी युती करताना वडिलांना देखील अंधारात ठेवले होते. त्यामुळे कुमारस्वामींनी धरमसिंह सरकारचा पाठिंबा काढताच देवेगौडा यांनी कर्नाटकच्या राज्यपालांना पत्र पाठवले होते. ठराविक आमदारांनी पाठवलेल्या पत्राला ग्राह्य धरु नये, असे त्यांनी सांगितले होते. पण या सर्व प्रकारामुळे पिता-पुत्रांमध्ये मतभेद निर्माण झाले.

कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात देवेगौडांची अनुपस्थिती

२००६ मध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला देवेगौडा अनुपस्थित होते. मी माझ्या विचारांशी तडजोड करणार नाही, असे देवेगौडा यांनी सांगितले. दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कुमारस्वामींविरोधात प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न देवेगौडांनी केला होता.

कुमारस्वामींच्या प्रचाराचे वैशिष्ट्य

प्रचारसभांमध्ये भावूक भाषणांसाठी कुमारस्वामींना ओळखले जाते. रामनगर हा त्यांचा मतदारसंघ मुस्लीमबहुल असून या मतदारसंघाने नेहमीच कुमारस्वामींना साथ दिली आहे. या मतदारसंघात त्यांनी काँग्रेसच्या इक्बाल हुसैन यांचा जवळपास २३ हजार मतांनी पराभव केला. याशिवाय चिन्नापट्टणम या मतदारसंघातूनही त्यांनी निवडणूक लढवली. या मतदार संघात त्यांनी भाजपाच्या योगेश्वर यांचा २० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.