गोव्याप्रमाणेच कर्नाटकमध्येही विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. शनिवारी संध्याकाळी चार वाजता विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे भवितव्य या बहुमत चाचणीतून ठरणार आहे. कर्नाटकमधील संख्याबळ आणि चार शक्यतांचा घेतलेला हा आढावा…

कर्नाटकमधील संख्याबळ
कर्नाटकमध्ये २२२ जागांपैकी १०४ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. तर काँग्रेसला ७८, जनता दल सेक्यूलर पक्षाला ३७ जागांवर विजय मिळाला आहे. कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी आणि बहुजन समाज पक्षाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. विधानसभेत एकूण २२४ जागा आहेत. पण यातील दोन जागांवरील मतदान पुढे ढकलण्यात आले. तर जनता दल सेक्यूलर पक्षाचे नेते कुमारस्वामी हे दोन जागांवरुन निवडून आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात विधानसभेतील संख्याबळ सध्या २२१ इतके आहे. विधानसभा अध्यक्षांना अपवादात्मक स्थितीत मतदानाचा अधिकार असतो. जर दोन्ही बाजूंनी समान मते झाली तरच विधानसभा अध्यक्ष मतदान करतात. त्यामुळे संख्याबळ २२० इतके असेल. अशा स्थितीत बहुमताचा आकडा १११ असेल आणि भाजपाला आणखी सात मतांची आवश्यकता भासेल.

> पहिली शक्यता
काँग्रेस व जनता दल सेक्यूलर पक्षाने भाजपावर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. तर भाजपाने बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस- जेडीएसच्या निवडणुकोत्तर युतीमुळे त्यांच्या पक्षातील काही आमदार नाराज असून ते भाजपा सरकारला मतदान करतील, असे भाजपाचे म्हणणे आहे. अशा स्थितीत भाजपा बहुमत चाचणी जिंकू शकतो आणि यासाठी त्यांना काँग्रेस- जेडीएस युतीतील सात आमदारांची मते फोडावी लागतील.

> दुसरी शक्यता
बेंगळुरुत आज घोडेबाजार तेजीत असेल. पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षाचा व्हिप झुगारुन मतदान करणाऱ्या आमदारांचे पक्षातून निलंबन केले जाते. यानुसार जर भाजपाने विरोधी बाकांवरील आमदार फोडले तर त्या आमदारांना राजीनामा द्यावा लागेल. यानुसार भाजपाला काँग्रेस- जेडीएस युतीतील १४ आमदारांना फोडावे लागेल. त्यामुळे विधानसभेतील एकूण संख्याबळ २२१ वरुन २०७ इतके होईल.

> शक्यता तिसरी
बी एस येडियुरप्पा हे बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा देऊ शकतात. यापूर्वी १९९६ मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांनी १३ दिवसांमध्येच राजीनामा दिला होता. पण २०१८ मध्ये भाजपाची धूरा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे आहे. फोडाफोडीत भाजपा सध्या आघाडीवर आहे. पण तरी देखील पुरेसे संख्याबळ जमा करण्यात अपयश आले तर येडियुरप्पा राजीनामा देतील, अशी शक्यताही आहे.

> चौथी शक्यता
भाजपाच्या चाणक्यांनी विरोधी पक्षातील १४ आमदार फोडले तर त्या आमदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे विधानसभेतील संख्याबळ २०७ वर येईल आणि विधानसभेत बहुमतासाठी लागणारा आकडाही खाली येईल.