देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांच्या डोक्यावरील छत्र हरपल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कमवत्या व्यक्ती गमवल्याने अनेक वृद्ध दाम्पत्य निराधार झाली आहेत. त्यामुळे राज्य सरकार पुढे सरसावत या कुटुंबांना मदतीचा हात देत आहे. मध्य प्रदेश सरकारने आई वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांना ५ हजार पेन्शन प्रति महिना देण्याचं आश्वासन दिलं आहे. दिल्ली सरकारनेही अशा कुटुंबासाठी विविध घोषणा केल्या आहेत. आता कर्नाटकातील मंत्री बीसी पाटील यांनी मतदारसंघातील कुटुंबांसाठी पुढाकार घेतला आहे. करोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.

कर्नाटकातील हिरेकेरुर मतदारसंघातील करोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना ५० हजार रुपये देण्याची त्यांनी घोषणा केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बीसी पाटील आपल्या खिशातून ही मदत करणार आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे मतदारसंघातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. बीसी पाटील हिरेकेरून मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. बीसी पाटील यांच्याकडे कृषी राज्यमंत्री पदाचा कार्यभार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बीसी पाटील यांना ८५,५६२ इतकी मंतं पडली आहेत.

कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यत एकूण २१ लाख ३० हजार अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १५ लाख १० हजार रुग्णांना करोनावर मात केली आहे. तर २१,०८५ जणांनी करोनामुळे प्राण गमावले आहेत.