पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार सभा घेणार आहेत. कर्नाटकच्या युवकांनी तिथे जावे आणि हवेत खुर्च्या उडवून आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा जाब विचारावा की २ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असे आवाहन जिग्नेश मेवाणीने केले आहे. हे आवाहन केल्याप्रकरणी कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात भाजपाने जिग्नेश मेवाणीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. चित्रदुर्ग या ठिकाणी जिग्नेश मेवाणीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत जिग्नेश मेवाणीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा उधळण्याचे आवाहन केल्याप्रकरणी ही एफआयआर दाखल केल्याचे भाजपा नेत्यांनी सांगितले आहे.

जिग्नेश मेवाणीने युवकांना सभा उधळण्यासाठी युवकांना भडकावले आहे.त्याचमुळे आम्ही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत जाणीवपूर्वक अडथळा आणण्यासाठी जिग्नेश मेवाणीने चिथावले आहे असाही आरोप भाजपाने केला. कर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी जवळ आली आहे. अशात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहे. त्यातच जिग्नेश मेवाणीने केलेल्या आवाहनामुळे भाजपाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आहे.