अफगाणिस्तानचे मावळते अध्यक्ष हमीद करझाई यांचे चुलतभाऊ हशमत करझाई हे मानवी बॉम्बहल्ल्यात ठार झाल्याची घटना कंदाहार शहराजवळ मंगळवारी घडली. त्यांच्या मृत्यूची बातमी सरकारी अधिकाऱ्यांनी अध्यक्षांच्या एका विभागाला कळवली. निवडणूक निकालादरम्यान ही घटना घडली. त्यामुळे या भागात काही काळ मोठी खळबळ उडाली.
अध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणातील दोन उमेदवारांपैकी अश्रफ गनी हे एक उमेदवार आहेत. गनी यांच्या प्रचाराचे व्यवस्थापक म्हणून हशमत हे काम पाहत होते. गनी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. यावरून त्यांच्या उमेदवारीला अनेकांचा विरोध आहे. गनी हे सत्तेवर आल्यास देशात मोठी अस्थिरता माजेल, अशी भीती व्यक्त करण्यात आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे ईद सर्वत्र साजरी होत असताना एकाने आपल्या तुर्बानच्या आत स्फोटके ठेवून ती हशमत यांच्याजवळ येऊन ती उडवून दिली. यात हशमत यांचा अंत झाला. हशमत यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी ही व्यक्ती त्यांच्या घरी आली होती, अशी माहिती कंदाहार प्रांतीय राज्यपालांचे प्रवक्ते दवा खान मिनापल यांनी दिली. हशमत यांना मिठी मारल्यानंतर त्याने स्वत:कडील स्फोटके उडवून दिली आणि त्यांना ठार केल्याचे मिनापल यांनी सांगितले. गनी आणि विरोधी पक्षनेते अब्दुल्लाह अब्दुल्लाह हे दोघे निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे होते. १४ जून रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर दोघांमध्ये मताधिक्यासाठी चुरशीची लढाई सुरू होती. या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार आरोप झाले आहेत. गनी हे प्राथमिक फेरीत विजयी झाले, तर अब्दुल्लाह यांना पराभूत म्हणून घोषित करण्यात आले. अर्थात या निकालास अब्दुल्लाह यांनी जोरदार विरोध करीत आपल्याला पराभव अमान्य असल्याचे स्पष्ट केले. मतदानात मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्यानेच आपल्याला हार पत्करावी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
यादवीची भीती
अब्दुल्लाह यांनी केलेल्या आरोपावरून निवडणुकांची विश्वासार्हता धोक्यात आल्याने दोन्ही बाजूंनी तक्रारींचा स्फोट झाला. त्यामुळे १९९२ ते १९९६ या काळात देशात झालेल्या वांशिक हिंसाचाराप्रमाणेच यादवी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हशमत यांनी पहिल्यांदा कय्याम करझाई यांच्यासाठी निवडणूक व्यवस्थापक म्हणून काम पाहिले होते. कय्याम हे हमीद करझाई यांचे भाऊ आहेत. त्यानंतर कय्याम यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे हशमत यांनी गनी यांचा प्रचार करण्यासाठी पुढाकार घेतला.