काश्मीरमध्ये निर्बंध शिथिल; दूरध्वनी सेवा अंशत: सुरू

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर तेथे लागू करण्यात आलेले काही निर्बंध शनिवारी हटविण्यात आले. काश्मीर खोऱ्यातील दूरध्वनी सेवा अंशत: सुरू करण्यात आली असून, जम्मूतील काही भागांत इंटरनेट सेवाही पूर्ववत करण्यात आली. यामुळे जम्मू-काश्मीरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

काश्मीरमधील ३५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्बंध शिथिल करण्यात आले. तेथील ९६ पैकी १७ दूरध्वनी केंद्रे पूर्ववत करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत ५० हजार दूरध्वनी शनिवारी सुरू करण्यात आले. काश्मीरमधील निम्मी दूरध्वनी केंद्रे रविवापर्यंत सुरू होतील, असे सरकारी प्रवक्ते रोहित कन्सल यांनी सांगितले.  काश्मीरमधील रस्त्यांवर शनिवारी वाहनांची वर्दळ वाढली होती. मात्र, बहुतांश व्यावयायिक आस्थापने आणि पेट्रोल पंप बंद होते. जम्मूमध्ये दूरध्वनी आणि मोबाइल, इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. जम्मूच्या  सांबा, कथुआ, उधमपूर, रियासी या जिल्ह्य़ांत इंटरनेटची २ जी सेवा सुरू करण्यात आली आहे; परंतु पूँछ, राजौरी, किश्तवार, दोडा, रामबन या जिल्ह्य़ांत इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे.

उद्यापासून शाळा सुरू : काश्मीर खोऱ्यातील सर्व प्राथमिक शाळा आणि सरकारी कार्यालये सोमवारपासून उघडणार आहेत. राजकीय नेत्यांच्या सुटकेचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल, असे सरकारी प्रवक्ते रोहीत कन्सल यांनी सांगितले.