अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्यावर मध्यस्थीचा प्रस्ताव मांडला आहे. धार्मिकतेच्या अंगाने विचार केल्यास काश्मीरमध्ये स्फोटक आणि जटिल परिस्थिती आहे. काश्मीरमवरुन दोन्ही देशांमध्ये तणाव कमी व्हावा यासाठी शक्य असेल ते सर्व मी करेन असे डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

काश्मीरमध्ये जटिल परिस्थिती आहे. तिथे हिंदू आणि मुस्लीम दोघेही आहेत. त्यांच्यामध्ये फार सख्य आहे असे मी म्हणणार नाही असे ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी सुद्धा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर  काश्मीर मुद्दावर मध्यस्थीची तयारी दाखवली होती. पण भारताने त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यानंतर अमेरिकेने सुद्धा काश्मीर भारत-पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मान्य केले होते.

या आठवडयात फ्रान्समध्ये होणाऱ्या जी ७ परिषदेत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहोत असे ट्रम्प यांनी सांगितले. भारत-पाकिस्तानमध्ये बऱ्याच समस्या आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी शक्य असेल ते सर्व मी करेन. धर्म एक कठिण विषय आहे असे ट्रम्प म्हणाले. काल ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या माझ्या दोन चांगल्या मित्रांशी आज फोनद्वारे चर्चा झाली. काश्मीरमधील परिस्थिती कठीण आहे पण दोघांशी उत्तम चर्चा झाली, असं ट्रम्प हे दोन्ही नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर म्हणाले होते.

भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानकडून जोरदार आगपाखड सुरु आहे. काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका जाहीर होण्यापूर्वी अफगाणिस्तानातून सैन्य मागे घ्यायचे आहे. त्यासाठी त्यांना पाकिस्तानची मदत लागणार आहे. त्यामुळेच ट्रम्प काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीसाठी इतका पुढाकार घेत आहेत.