यूपीएच्या काळात निर्भया प्रकरण घडल्यावर त्यावेळी विरोधात असलेल्या स्मृती इराणी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या भेट म्हणून पाठवल्या होत्या. आता उन्नाव आणि कठुआतील बलात्कार प्रकरणानंतर केंद्रात मंत्री असलेल्या स्मृती इराणी पंतप्रधान मोदींना काय पाठवणार आहेत? असा प्रश्न पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी विचारला आहे. मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवण्याची हिंमत दाखवणाऱ्या स्मृती इराणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बांगड्या पाठवणार का? असेही त्यांनी विचारले आहे.

सध्या देशात उन्नाव आणि कठुआ येथील सामूहिक बलात्कार प्रकरण चांगलेच गाजते आहे. याच प्रकरणात आता स्मृती इराणी यांना प्रश्न करत हार्दिक पटेल यांनी खोचक प्रश्न विचारला आहे. तसेच स्मृती इराणी उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणात गप्प का? एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या घोषणा देतात. दुसरीकडे भाजपाच्याच राज्यात महिला सुरक्षित नाहीत अशी परिस्थिती आहे. उन्नाव आणि कठुआ या ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटनांमुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे असेही हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.

विकासाच्या नावाखाली देशातले वातावरण भकास करण्यापलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केले? असा प्रश्नही हार्दिक पटेल यांनी विचारला होता.