केरळच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने सरस्वती पूजा करण्यास परवानगी नाकारली आहे. आम्ही सेक्युलर आहोत म्हणजेच सर्वधर्मीय परंपरा पाळणारे आहोत त्यामुळे सरस्वती पूजा करता येणार नाही असे या महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे.

केरळच्या अलापुज्झा जिल्ह्यात कोचीन महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात सरस्वती पूजेला संमती देण्यात आलेली नाही. आमच्या कुलगुरुंनी सरस्वती पूजा करण्यास मनाई केली आहे कारण आमची संस्था सर्वधर्मीय परंपरा पाळणारी संस्था आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही धार्मिक बाबींना आम्ही महाविद्यालयाच्या आवारात संमती देऊ शकत नाही असे कुलगुरुंनी म्हटल्याचे महाविद्यालयाच्या रजिस्ट्रारने म्हटले आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी गोमांसाच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर आता सरस्वती पूजेला संमती न दिल्याने हे महाविद्यालय पुन्हा चर्चेत आले आहे.