मागच्या काही दिवसांपासून केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळमधल्या १४ पैकी १२ जिल्ह्यांना या पावासाचा तडाखा बसला आहे. अनेक भागांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. पावसाचे हे रौद्ररुप पाहून केरळमधल्या जनतेला १९२४ सालची पुनरावृत्ती होण्याची भिती सतावत आहे. केरळच्या इतिहासात १९२४ साली सर्वाधिक पाऊस कोसळला होता.

त्यावर्षी सलग तीन आठवडे केरळमध्ये ३,३६८ मिमि पाऊस झाला होता. त्यावेळी पेरीयार नदीला आलेल्या पुरामुळे कारीनथिरी मलाई ही टेकडी वाहून गेली होती. त्यावेळच्या पुराबद्दलची अधिकृत माहिती उपलब्ध नाहीय पण जवळपास १ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. यंदाच्या मोसमात १९२४ सारखा पाऊस कोसळलेला नाहीय. पण १ जून ते १५ ऑगस्ट या काळात २,०८७.६७ मिमि पावसाची नोंद झाली आहे.

आतापर्यंत ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. अजून मान्सूनचे काही आठवडे बाकी आहेत त्यामुळे १९२४ सालच्या पावसाचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सुद्धा १९२४ साला नंतर पावसामुळे ओढवलेली ही सर्वात वाईट आपत्ती असल्याचे म्हटले आहे.

भारतीय हवामान विभागाकडे यंदाच्या मान्सूनमधील जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार देशातील ६४० पैकी २८३ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाला आहे. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला केरळमध्ये धुवाधार पाऊस कोसळत आहे.