आठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्रीय बचाव पथकांसोबत भारतीय नौदलाचे शेकडो जवान पुरग्रस्त भागात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. याच बचावकार्यातील एक व्हिडिओ नेव्हीने ट्विट केला आहे. त्यामध्ये त्यांनी एका गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या साह्याने वाचवले आहे. या व्हि़डिओमध्ये महिलेला दोरीच्या मदतीने पुराच्या भागातून हेलिकॉप्टरमध्ये ओढण्यात आले आहे. सुजीता जबेल असे त्या गर्भवती महिलेचे नाव आहे.

वाचा – कौतुकास्पद! साखरपुडा केला रद्द, पैसे दिले पूरग्रस्तनिधीला

मिळालेल्या महितीनुसार, बचावकार्या दरम्यान २५ वर्षीय सुजीताच्या पोटाला धक्का लागल्यामुळे गर्भाशयाला दुखापत झाली . त्यावेळी भारतीय नेव्हीने प्रसंगावधान दाखवत त्या महिलेला जवळील संजीवनी रूग्णालयात दाखल केले. वेळीच डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करत ऑपरेशन केले. सध्या बाळ-बाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत.

सोशल मीडियावर नेव्हीच्या या कार्याची स्तुती करण्यात येत आहे. या महिलेशिवाय नेव्हीने आणखी एका मुलाला वाचवले आहे. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओमध्ये अलुवा इथल्या एका घराच्या छप्परवर अडकलेल्या लहान मुलाला नेव्हीच्या जवान वाचवताना दिसत आहे. चॉपरवरून हार्नेसच्या आधारे खाली येऊन घराच्या छतावरून त्या चिमुकल्याला उचलून सुरक्षितरित्या वाचवण्यात आलं.

नौदलाचे हे बचावकार्य पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. केरळमध्ये दिवसरात्र हे बचावकार्य सुरू असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितवर मात करत हे जवान लोकांचे प्राण वाचवत आहेत. लष्कर, नौदल व हवाईदलाच्या ५२ तुकड्या मदत कार्यात जुंपल्या असून अनेक अशासकीय संस्थाही मदतीसाठी सरसावल्या आहेत.  केरळमध्ये मुसळधार पावसामुळे महापूरसदृश स्थिती असून गुरुवारी या पुराने आणखी ३० बळी घेतले. सध्या या पुरामुळे मृतांची एकूण संख्या आता १६७ वर पोहोचली आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तब्बल ८ हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे नुकसान तसेच जीवितहानी आणखी वाढण्याची भीती आहे.