केरळमध्ये मुसळधार पावसामुळे महापूरसदृश स्थिती असून यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. पावसाच्या हाहाकारामुळे आतापर्यंत तब्बल आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बचावकार्य सुरू असून भारतीय नौदलाने खराब हवामानाशी दोन हात करत त्रिचूर, अलुवा आणि मुवात्तूपुझा येथे अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.

पुराने वेढलेल्या घराच्या छप्परांवर रहिवासी अडकले असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच नौदलाचा एक जवान चिमुरड्याला वाचवताना एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे, ज्यावर सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. नौदलाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अलुवा इथल्या एका घराच्या छप्परवर अडकलेल्या लहान मुलाला फ्लाइट डायव्हर वाचवताना दिसत आहे. चॉपरवरून हार्नेसच्या आधारे खाली येऊन घराच्या छतावरून त्या चिमुकल्याला उचलून सुरक्षितरित्या वाचवण्यात आलं.