केरळमध्ये सत्तेवर आलेल्या डाव्या आघाडीने चालू वर्षासाठीचा अर्थसंकल्प शुक्रवारी तेथील विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे फॅट टॅक्स. नामांकित रेस्तराँमध्ये पिझ्झा, बर्गर, पास्ता खाणाऱ्यांना यापुढे अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण राज्य सरकारने या खाद्यपदार्थांवर तब्बल १४.५ टक्के इतका फॅट टॅक्स लावण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवला आहे. त्याचबरोबर काही पॅकेज्ड पदार्थांवर पाच टक्के इतका नवा करही लावण्यात आला आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक आरोग्य, कल्याणकारी योजना आणि शिक्षणाकडे जास्त लक्ष देण्यात आले असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आले आहे. यासाठी उत्पन्नाते नवे स्रोत म्हणून फॅट टॅक्स हा नवा कर लागू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
केरळमधील नामांकित रेस्तराँमध्ये पिझ्झा, बर्गर, पास्ता खाणाऱ्यांच्या बिलामध्ये १४.५ टक्के इतका नवा टॅक्स लावण्यात येणार आहे. राज्य सरकार सध्या आर्थिक अडचणीतून जात असून, त्यावर मार्ग काढण्यासाठीच नवा टॅक्स लावण्यात आल्याचे राज्याचे अर्थमंत्री टी. एम. थॉमस यांनी सांगितले.