शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानी सैनिकांनी सीमेपलीकडून केलेल्या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले आहेत. या हत्याकांडाची पाकिस्तानने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी भारताने रविवारी केली.
भारताने नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला असताना पाकिस्ताननेही जबाबदारीने वागावे आणि शांतता प्रक्रियेला बाधा येईल असे कृत्य करू नये, असे भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी पाकिस्तानला सुनावले.
भारतीय जवानांच्या हत्येनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर खुर्शिद म्हणाले की, पाकिस्तानकडून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्याबाबत कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारने स्वीकारायला हवी. आम्ही पाकिस्तानात लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या पाकिस्तान सरकारशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. पाकिस्तानी लष्कर वा इतर संस्थेशी नाही, असेही खुर्शिद यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना खुर्शिद यांनी मुंबईतील घटना असो वा इतर कारवाया असो पाकिस्तानने नेहमीच आपले हात झटकल्याची टीका केली.
दरम्यान, पुढील महिन्यात न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा करणार असल्याबाबत विचारले असता खुर्शिद यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.