उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अण्वस्त्रे नष्ट करण्याचे आश्वासन दिले असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. दरम्यान, सिंगापूरच्या बैठकीतील चर्चा यशस्वी पार पडली तर किम जोंग उन यांना व्हाइट हाऊसमध्ये आमंत्रित केले जाईल, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

मंगळवारी ही शिखर बैठक होत असून ती व्यवस्थित पार पडली नाही आणि उद्दिष्टे साध्य होत नाहीत असे दिसून आले तर त्यातून आपण बाहेर पडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अमेरिका व प्रादेशिक मित्रदेशांना अशी अपेक्षा आहे, की उत्तर कोरियाने अण्वस्त्र निर्मिती सोडून द्यावी. ट्रम्प व किम हे सिंगापूरमधील सेनटोसा या लहानशा बेटावर भेटणार असून, १२ जूनची शिखर परिषद ही उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यातील पहिलीच बैठक आहे. ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांच्याशी व्हाइट हाऊस येथे चर्चा केल्यानंतर शिखर बैठकीच्या फलनिष्पत्तीवर पुढचे सगळे काही अवलंबून राहील असे संकेत दिले आहेत. जर किम जोंग उन यांच्याशी चर्चा यशस्वी झाली तर त्यांना व्हाइट हाऊस किंवा मार ए लागो या फ्लोरिडातील रिसॉर्टवर आमंत्रित करणार का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की कदाचित व्हाइट हाऊसमध्ये त्यांना निमंत्रित केले जाईल, पण तसे होणे आवश्यक आहे.

कोरियन युद्ध संपवण्यासाठीच्या वाटाघाटी कदाचित यशस्वी होतील, पण त्यानंतर काय होते हे महत्त्वाचे आहे. जर आमची उद्दिष्टे साध्य होणार नसतील तर चर्चेतून बाहेर पडू. तशी वेळ येईल असे वाटत नाही, कारण किम जोंग उन यांनाही त्यांच्या लोकांसाठी काही भव्यदिव्य करून दाखवण्याची इच्छा असेल. आम्ही चर्चेतून माघार घेऊ शकतो. आधी  तसे केलेही आहे. इराणच्या अणुकरारातून आम्ही माघार घेतली हे त्याचे उदाहरण आहे असे ट्रम्प यांनी सांगितले.