जगातील अनेक देश आता लॉकडाउनमधून बाहेर येत असून तिथे दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरु झाले आहेत. नेदरलँडमध्ये अन्य उद्योग-व्यवसायांच्याबरोबरीने सेक्स वर्करनाही परवानगी देण्यात आली आहे. करोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी या सेक्स वर्करना फक्त किसिंगला मनाई करण्यात आली आहे.

जगातील अन्य देशांप्रमाणे नेदरलँडमध्येही लॉकडाउन असल्याने इथल्या नृत्यांगना, शरीरविक्रय करणाऱ्या महिलांकडे मागच्या साडेतीन महिन्यांपासून उत्पन्नाचे कुठलेही साधन नव्हते. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

नेदरलँडच्या सरकारने या सेक्स वर्करना आश्चर्याचा धक्का दिला. कारण आधी त्यांना एक सप्टेंबरपासून परवानगी देण्यात येईल अशी शक्यता होती. पण दोन महिनेआधीच एक जुलैला सरकारकडून त्यांना परवानगी देण्यात आली.

नेदरलँडची राजधानी अ‍ॅमस्टरडॅममध्ये असलेल्या रेड लाईट भागाला हजारो पर्यटक भेट देत असतात. इथले सेक्स शो, कामुक वस्तुंची गिफ्ट शॉप्स आणि शरीरविक्रिय करणाऱ्या महिलांसाठी इथे हजारो लोक येतात. पण मागच्या साडेतीन महिन्यांपासून इथले रस्ते ओस पडले होते.

अ‍ॅमस्टरडॅममधल्या शरीरविक्रिय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या रेड लाइट युनायटेड या संघटनेने लवकरात लवकर काम सुरु व्हावे, यासाठी मोहिम चालवली होती. अनेक सेक्स वर्करना ते वापरत असलेल्या जागेचे भाडे भरता येत नव्हते. लॉकडाउनमुळे त्यांना बेकायद काम करावी लागत होती. सेक्स वर्करचे हे सर्व मुद्दे या संघटनेने मांडले.