कोलकात्यातील कमला गर्ल्स स्कूल सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. शाळेतील काही विद्यार्थिनींकडून शाळा प्रशासनाने एका कागदावर ‘आम्ही लेस्बियन आहोत’, असे बळजबरीने लिहून घेतले आहे. पालकांमध्ये या प्रकारामुळे नाराजी पसरली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

दक्षिण कोलकाता येथे कमला गर्ल्स स्कूल असून या शाळेतील दहा विद्यार्थिनींकडून ८ मार्च रोजी शाळेच्या मुख्याध्यापिकेने ‘आम्ही लेस्बियन आहोत’ असे एका कागदावर लिहून घेतल्याचा आरोप आहे. ‘आम्ही लेस्बियन असून आम्ही शाळेत मुलींसोबत असभ्य वर्तन केले’, असे आमच्याकडून बळजबरीने लिहून घेण्यात आल्याचा आरोप एका विद्यार्थिनीने केला आहे.

हा प्रकार इथेच थांबला नाही. शाळा प्रशासनाने १२ मार्च रोजी पालकांना शाळेत बोलावून घेतले. ‘मुख्याध्यापिकेच्या कक्षात मुलींनी दिलेला कबुलीजबाब आमच्या हाती देण्यात आला. हा सगळा प्रकार धक्कादायक होता. आमच्या मुलींनी जे कृत्य केलेच नव्हते, त्याचा कबुलीजबाब घेण्यात आला, असा आरोप पालकांनी केला आहे.

शाळेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींना शिस्त लागावी यासाठी ही एक शिक्षा होती. त्या मुली वर्गात मस्ती करत होत्या. त्यामुळे मुख्याध्यापिकेने मुलींना बोलावून त्यांच्याकडून लिहून घेतले, पालकांनाही शाळेत बोलावून त्यांच्या मुलींनी केलेल्या कृत्याची माहिती देण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

शाळेच्या मुख्याध्यापिका शिखा सरकार यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्या १० मुलींनी शाळेत असभ्य वर्तन केले होते. त्यांनी चूक मान्य केली आहे. त्यांनी केलेले कृत्य गंभीर स्वरुपाचे होते, म्हणूनच आम्ही मुलींकडून ते पत्र लिहून घेतले, असे त्यांनी सांगितले. तर समाजसेवी संघटनांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.  समलैंगिकांविरोधात समाजाची मानसिकता यातून दिसून येते, असे समाजसेवी संघटनांचे म्हणणे आहे.