पाकिस्तानने अटक करून फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालय उद्या (गुरुवारी) निकाल देणार आहे. न्यायालयाच्या निकालाकडे देशभराचे लक्ष लागले असून जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्काची मागणी करण्यात आली होती, पण पाकिस्तानने त्यास नकार दिला याकडे भारताने लक्ष वेधले होते.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या कथित आरोपाखाली ही शिक्षा सुनावली होती. याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. सोमवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या याचिकेवर सुनावणी झाली होती. जाधव यांना गेल्या वर्षी ३ मार्चला अटक करून हेरगिरी व विध्वंसक कारवायांच्या खोट्या प्रकरणात गोवण्यात आले. तसेच त्यांच्याकडून जबरदस्तीने जबाब घेण्यात आला असा दावा भारताने न्यायालयात केला होता. भारताच्या याचिकेवर न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे निर्देश दिले होते. वकील हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती. जाधव यांच्या दूतावास संपर्काच्या सोळा विनंत्या पाकिस्तानने फेटाळल्या असून व्हिएन्ना जाहीरनाम्यातील तरतुदींचे त्यामुळे उल्लंघन झाले आहे. पाकने मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचे साळवे यांनी न्यायालयात सांगितले होते.

पाकिस्तानने भारताचा दावा फेटाळून लावला होता. ‘जाधव हे हेरच असून, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे भारताला देता आलेली नाहीत’, असे पाकने म्हटले होते. सुनावणीदरम्यान जाधव यांची चित्रफीत प्रदर्शित करण्याची परवानगी पाकिस्तानने मागितली होती. आपण भारतासाठी हेरगिरी करीत होतो, अशी कबुली जाधव यांनी दिल्याचे त्या चित्रफीतीत दिसत होते. ही चित्रफीत प्रदर्शित करण्यास न्यायालयाने पाकला परवानगी नाकारली होती. पाकसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात होते.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने लवकरात लवकर निकाल देऊ असे सांगितले होते. आता आंतरराष्ट्रीय न्यायालय गुरुवारी दुपारी म्हणजेच भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता निकाल देणार आहे.