नवी दिल्ली : कुणाल कामरा याने पत्रकार अर्णब गोस्वामी यांना  सतावण्यासाठी प्रश्न विचारल्याची घटना इंडिगो एअरलाइन्सच्या ज्या विमानात घडली, त्याच्या वैमानिकाने या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या विमान कंपनीने आपल्याला विचारणा न करता आणि केवळ समाजमाध्यमांवरील पोस्टच्या आधारे कामराविरुद्ध ही कारवाई केल्यामुळे आपण ‘निराश’ झालो असल्याचे त्याने म्हटले आहे.

या स्टँड अप कॉमेडिअनने सुरक्षिततेला कुठलाही धोका उत्पन्न केला नाही, किंवा कुठल्याही सूचनांचे उल्लंघन केले नाही. कामरा यांची वर्तणूक रुचिहीन असली, तरी पहिल्या स्तराच्या (लेव्हल १) बेलगाम प्रवाशाच्या व्याख्येत बसणारी नव्हती. खरे तर, अशा प्रकारच्या किंवा यापेक्षा वाईट स्वरूपाच्या घटना ज्या बेफाम प्रकारच्या नव्हत्या, त्याबाबत आम्ही सर्व वैमानिक खातरजमा करू शकतो, असे या वैमानिकाने व्यवस्थापनाला पाठवलेल्या ई-मेल संदेशात म्हटले आहे.

या प्रकरणात केवळ समाजमाध्यमांवरील पोस्टच्या आधारे माझ्या कंपनीने कारवाई केल्याचे कळल्यानंतर मी निराश झालो. विमानोड्डाणाच्या माझ्या ९ वर्षांच्या कारकीर्दीत हे काहीसे अभूतपूर्व आहे, असेही या ई-मेलमध्ये नमूद केले आहे.

या संदर्भात इंडिगो एअरलाइन्सच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, ‘आम्हाला संबंधित निवेदन मिळाले असून, या घटनेच्या संबंधात अंतर्गत समितीने तपास सुरू केला आहे’, असे उत्तर देण्यात आले.