नोटाबंदीचा निर्णय हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सांगत मला संसदेत बोलू दिल्यास राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नोटाबंदीमुळे लोकांचा मृत्यू होत असल्याचे राहुल गांधी म्हणत आहेत, पण काँग्रेसच्या सत्ताकाळात लाखो लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, हे ते विसरत आहेत. मग ते उपदेश देणारे कोण? असा सवाल नायडू यांनी केला आहे.

नोटाबंदीचा निर्णय हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून मला याबाबत संसदेत बोलायंच आहे. मी तिथं सर्व बोलणार असल्याचे सांगत संसदेत मला बोलण्याची परवानगी दिल्यास राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. यावरून केंद्रीय मंत्री नायडू यांनी गांधी यांना प्रत्युत्तर देत त्यांची खिल्ली उडवली आहे. असे काही न होवो, यासाठी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. मला वाटते की, सभागृहात भाजपच्या सदस्यांची संख्या अधिक असल्याचे राहुल असा विचार करत आहेत, असे नायडू म्हणाले.

नोटाबंदीचा निर्णय मूर्खपणाचा आहे, असे म्हणणाऱ्या राहुल गांधींवर त्यांनी तिखट शब्दांत टीका केली. ते उपदेश देणारे कोण, असा सवाल त्यांनी केला आहे. ज्यांच्या सत्ताकाळात कोळसा, टूजी, कॉमनवेल्थ, युरिया, आदर्श असे अनेक घोटाळे झाले आहेत, ते दुसऱ्यांना कसे उपदेश करू शकतात, असेही ते म्हणाले. अमली पदार्थांचे माफिया, काळा पैसा आणि मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांविरोधात कारवाई करणे मूर्खपणाचे आहे काय, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. यावेळी त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली. जनतेच्या हितार्थ मोदींनी हा निर्णय घेतला आहे. मी त्यांना सलाम करतो, असेही ते म्हणाले. काँग्रेसने सांगावे की, ते काळ्या पैशांच्या विरोधात आहेत, की काळा पैसा बाळगणाऱ्यांच्या सोबत आहेत, असा थेट प्रश्नच त्यांनी गांधींना विचारला.

यावेळी स्मृती इराणी यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांच्या येण्यानेच भूकंप होतो. बाहेर काहीच होत नाही, असे त्या म्हणाल्या. आपली बोलण्याची क्षमता अधिक आहे, असा राहुल यांचा समज आहे. त्यांच्या येण्याने भूंकपाचे परिणाम काँग्रेसमध्येच दिसून येतात, असेही त्या म्हणाल्या.