चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. अभी ग़नीमत है सब्र मेरा, अभी लबालब भरा नहीं हूँ, वह मुझको मुर्दा समझ रहा है, उसे कहो मैं मरा नहीं हूँ, असे ट्विट करत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

दुसरीकडे तेजस्वी यादव यांनीही शनिवारी कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या रॅलीत पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीकास्त्र सोडले होते. भाजपा धर्माच्या आधारावर देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना साथ देत नसल्याने सीबीआय आणि ईडीला माझे वडील लालूप्रसाद आणि आमच्या कुटुंबीयांमागे लावले आहे. मोदीजी खोटेपणाचे निर्माते, ठोक विक्रेता आणि वितरक आहेत. ते एक खोटं बोलतात आणि भेट म्हणून त्याबरोबर १० आणखी खोट्या गोष्टी देतात, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.

रेल्वे घोटाळ्याशी निगडीत दोन प्रकारांमध्ये दिल्लीच्या एका न्यायालयाने शनिवारी लालू यादव यांच्या हंगामी जामिनाचा कालावधी २८ जानेवारीपर्यंत वाढवला आहे. विशेष न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी याप्रकरणी लालूप्रसाद आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यांचा जामीन २८ जानेवारीपर्यंत वाढवला आहे.