चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाकडून कोणता दिलासा मिळालेला नाही. सोमवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दुमका कोषागार प्रकरणी लालूंना दोषी ठरवलं आहे. सहापैकी चार खटल्यात लालूंवरील दोष सिद्ध झाले आहेत. दुसरीकडे बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची मात्र सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी लालू प्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांच्यासहित ३१ जणांना आरोपी करण्यात आलं होतं. न्यायालयाने १९ जणांना दोषी ठरवलं असून, १२ जणांची सुटका केली आहे. लालूंच्या शिक्षेवर २१,२२ आणि २३ मार्चला सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने निर्णय सुनावल्यानंतर आरजेडी नेता रघुवंश प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटलं की, ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नितीश यांची खेळी पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे’.

लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले आहेत, ज्यापैकी तीन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर आज दुमका कोषागार या चौथ्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं. लालूप्रसाद यांच्यावर डिसेंबर १९९५ ते जानेवारी १९९६ दरम्यान दुमका कोषागारमधून १३.१३ कोटी रुपये बोगस पद्धतीने काढल्याचा आरोप आहे.

चारा घोटाळ्याच्या पहिल्या प्रकरणात लालूंना २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दुस-या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना दोषी ठरवत २३ डिसेंबर २०१७ रोजी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली. याशिवाय चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणात न्यायालयाने २४ जानेवारी २०१८ ला लालूंना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. लालूप्रसाद यादव सध्या बिरसा मुंडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.