राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुशील मोदी यांनी ९० लाखांच्या माती घोटाळ्याचा आरोप केला आहे. हा घोटाळा लालूंचा मुलगा तेजप्रताप यादव याच्यामार्फत केल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुशील मोदी यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत यासंबंधीचे दस्तावऐवज सादर केले.

पाटणातील सगुणामध्ये एका शॉपिंग मॉलचे बांधकाम सुरू आहे. मोदींच्या मते, या जमिनीची मालकी डिलाइट मार्केटिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे. या कंपनीच्या तीन संचालकांमध्ये लालूप्रसाद यांचे दोन मुले तेजप्रताप आणि तेजस्वी यांच्याबरोबर मुलगी चंदा यादव यांचाही समावेश आहे. या जमिनीवर मॉल उभारणीचे काम ज्या कंपनीला दिले आहे. त्याचे मालकी आरजेडीचे आमदार अबू दोजना आहेत. या मॉलमध्ये तळघरात द्विस्तरीय पार्किंग आहे. या बांधकामावेळी काढण्यात येणारी माती पाटणातील प्राणिसंग्रहालयात वापरण्यात येणार आहे. पाटणा प्राणिसंग्रहालयात मातीचेच काम सुमारे ९० लाख रूपये इतके झाले आहे. परंतु, या प्राणिसंग्रहालयात जी माती देण्यात आली आहे. ती निर्माणाधीन अवस्थेतील मॉलमधूनच आणलेली आहे का याचे पुरावे देण्यात आलेले नाहीत. पाटणा येथील प्राणिसंग्रहालय वन विभागातंर्गत येते आणि तेजप्रताप यादव हे वनमंत्री आहेत.
लालूप्रसाद यादव यांना मातीची विल्हेवाट लावायची होती. त्यासाठी त्यांनी विनाटेंडर हे काम वीरेंद्र यादव यांना दिल्याचा दावा मोदी यांनी केला आहे. वीरेंद्र यादव हे लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आहेत. पाटणातील या प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्याने हे काम विनाटेंडरचे केल्याचे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. सुशील मोदी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर तेजप्रताप यादव यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
वन अधिकाऱ्यांनीही या कामात गडबड असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर प्राणिसंग्रहालयाचा प्रमूख अधिकारी ९० लाखांचे काम विना टेंडर देऊ शकतो का, असा सवालही उपस्थित केला आहे. लालूप्रसाद यादव यांनी या प्रकरणी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.