चारा घोटाळ्यामध्ये शिक्षा भोगत असलेले आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव सोमवारी दिल्लीच्या एम्समधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजधानी एक्सप्रेसने पटना जात होते. मात्र, रस्त्यात अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर कानपूर स्थानकावर दोन डॉक्टरांना बोलावण्यात आलं, त्यांनी लालूंची तपासणी केली. लालूंचा रक्तदाब वाढला होता, त्यांना औषधं देऊन ट्रेन रवाना करण्यात आली. मंगळवारी सकाळी 9 वाजता लालू रांचीच्या रिम्स रुग्णालयात पोहोचले.

लालू प्रसाद यादवांनी एम्स व्यवस्थापकांना पत्र लिहून डिस्चार्ज न देण्याची विनंती केली होती. मला चांगल्या उपचारासाठी रांचीहून दिल्लीच्या एम्समध्ये पाठवण्यात आलं होतं. माझी प्रकृती अद्यापही सुधारलेली नाही. सातत्याने माझा रक्तदाब वाढतोय, हृदयायाचा त्रास देखील जास्त जाणवतोय शिवाय चक्कर देखील येत आहेत, किडनी इन्फेक्शन, डायबेटिससह इतर आजारांनी मी ग्रस्त आहे, अशी अनेक कारणं देऊन लालूंनी डिस्चार्ज न देण्याची विनंती केली होती. परंतु लालूंची तब्येत ठीक असल्याचं कारण देत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्यापूर्वी काल एम्स रुग्णालायत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली होती.