24 September 2020

News Flash

पत्रकार-प्रसारमाध्यमांवरचे हल्ले रोखण्यासाठी सगळ्या राज्यांमध्ये कठोर कायदे आवश्यक -आठवले

प्रसारमाध्यमांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेसकडूनही निषेध

रामदास आठवले. (संग्रहित छायाचित्र)

पत्रकार आणि प्रसामाध्यमांवरचे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोलून दाखवली आहे. तसेच राज्य सरकारने पत्रकारांना सहकार्य केले पाहिजे असेही आठवले यांनी म्हटले आहे. गुरुग्रामच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी प्रद्युमन ठाकूर या सात वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली. त्यानंतर या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा ही मागणी करत संतप्त पालकांनी आंदोलन सुरु केले. या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले.

आंदोलकांनी शाळेजवळ असलेले एक दारुचे दुकान जाळले. त्यानंतर पोलिसांनी या जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुरू केला. त्याचवेळी पोलिसांनी या घटनेचे  वार्तांकन करण्यासाठी आलेल्या काही प्रसारमाध्यमांच्या कार आणि ओबी व्हॅनचीही तोडफोड केली. या आणि इतर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.

रविवारी झालेल्या घटनेसंदर्भात हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचीही भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एकट्या हरयाणातच नाही तर देशातील सगळ्या राज्यांमध्ये पत्रकार आणि प्रसारमाध्यमांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात कठोर कायदे करण्याचे आवाहनही आपण करणार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

मागील महिन्यात २५ ऑगस्ट रोजी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिमला त्याच्याच आश्रमातील दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आणि त्यानंतर तीन दिवसांनी २० वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली. या घटनेनंतरही पंचकुला आणि सिरसा भागात मोठा जनक्षोभ उसळला होता, त्यावेळीही प्रसारमाध्यमांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही लक्ष्य करण्यात आले.

५ सप्टेंबर रोजी कर्नाटकमध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. एवढेच नाही तर महाराष्ट्र, दिल्लीतही पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रकार याआधीही झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी देशभरात पत्रकार आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान काँग्रेसने रविवारी गुरुग्रामध्ये पोलिसांकडून प्रसारमाध्यमांवर जो हल्ला झाला त्याचा निषेध केला. तसेच ज्या पोलिसांनी प्रसारमाध्यमांच्या कारवर हल्ला चढवला त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करायला हवी असेही काँग्रेसने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2017 5:24 pm

Web Title: law must be made to protect journalists says ramdas athawale
Next Stories
1 पंतप्रधानपदी असतानाही नरेंद्र मोदी गुजरातच्या विकासाचाच विचार करताहेत : अमित शहा
2 काळा पैसा शोधण्यासाठी सोशल मीडियावर आयकर विभागाची करडी नजर
3 काँग्रेसचे जम्मू-काश्मीरमध्ये शांततेसाठी प्रयत्न; मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जम्मूत दाखल
Just Now!
X