नवी दिल्ली : लष्कराचे गुपित फोडणे हा देशद्रोह असून, यात गुंतलेल्या लोकांना शिक्षा केली जावी, तसेच पंतप्रधानांनी या संदर्भात आपली बाजू स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते ए. के. अँटनी यांनी बुधवारी केली.

सध्या समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी व बीएआरसीचे सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅपवरील संवादाच्या संदर्भात ते बोलत होते.

या ‘देशद्रोही कृत्यात’ सहभागी असलेल्यांना कुठलीही दया दाखवली जाऊ नये आणि २०१९ च्या हवाई हल्ल्यांबाबतची माहिती फुटल्याबद्दल सरकारने त्वरित चौकशीचा आदेश द्यावा, अशी मागणी गुलाम नबी आझाद, सुशीलकुमार शिंदे व सलमान खुर्शीद या पक्षनेत्यांसह घेतलेल्या पत्रकार परिषदेत अँटनी यांनी केली.

‘सरकारी गुपित फोडणे हे गुन्हेगारी कृत्य आहे. लष्करी मोहिमा, राष्ट्रीय सुरक्षेची प्रकरणे, संवेदनशील लष्करी मोहिमा, विशेषत: लष्करी हल्ले यांची माहिती फोडणे हा देशद्रोह आहे. यासाठी त्यांना शिक्षा व्हायलाच हवी’, असे अँटनी म्हणाले.