केंद्र सरकारचा नवा उपक्रम

पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल भरत असतानाच ग्राहकांना आता एलईडी बल्ब, पंखा आणि टय़ूबलाइट्सची अतिशय कमी दरात खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना या ठिकाणी ६५ रुपयांत एलईडी, २३० रुपयांमध्ये टय़ूबलाइट्स आणि ११५० रुपयांमध्ये पंखा खरेदी करता येणार आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी पेट्रोलियम विपणन कंपन्या ही उपकरणे सरकारी कंपनी असलेल्या एनर्जी इफिशिएन्शी सव्‍‌र्हिस लिमिटेड (ईईएसएल) कडून खरेदी करणार आहे.

या उपकरणांची विक्री करण्यासाठी कंपन्या आणि ईईएसएल यांच्यामध्ये गुरुवारी करार करण्यात येणार होता. मात्र पर्यावरण मंत्री अनिल दवे यांचे निधन झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याचे, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.

या करार करण्याची पुढील तारीख लवकरच ठरवण्यात येईल. त्यानंतर जवळपास एका महिन्यानंतर पेट्रोल पंपावर ही उत्पादने उपलब्ध करण्यात येणार आहेत. या तीन कंपन्यांचे देशभरात ५३ हजारपेक्षा अधिक पेट्रोल पंप आहेत. मात्र ही उपकरणे या कंपन्यांच्या सर्व पेट्रोल पंपावर उपलब्ध होणार अथवा नाहीत हे सध्या स्पष्ट झालेले नाही.

ग्राहकांना फायदा

ईईएसएल सरकारच्या प्रकाश योजनेच्या अंतर्गत एलईडी बल्बची स्वस्तामध्ये विक्री करत आहे. मोठय़ा प्रमाणावर बल्बची निर्मिती केल्यामुळे एलईडी बल्ब फक्त ६५ रुपयांत उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकांची ३८ रुपयांची बचत होणार आहे. तर एलईडी टय़ूबलाइट्स आणि पंखा यांचा बाजारातील विक्रीचा दर अनुक्रमे ६०० ते ७०० आणि १७०० ते १८०० रुपये आहे. पेट्रोल पंपावर टय़ूबलाइट्स आणि पंखा  अनुक्रमे २३० आणि ११५० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे काही प्रमाणात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.