तृणमुल काँग्रेस डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत असल्याचा आरोप करत संसदेत आणि संसदेबाहेर डाव्या पक्षांच्या खासदारांनी निदर्शने केली. राज्यात कोणतेच स्थान राहिले नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन आरोप केले जात असल्याचे उत्तर तृणमूल काँग्रेसने दिले आहे.
संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हातात फलक घेऊन पश्चिम बंगालमधील लोकशाही वाचवा अशा आशयाच्या घोषणा दिल्या. लोकसभेचे कामकाज सुरू होताच डाव्या पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केल्याने तीन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. राज्यसभेत माकपचे सीताराम येचुरी यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जनतेने नाकारल्याने डावे पक्ष आता आरोप करत असल्याची प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते सुदीप बंडोपाध्याय यांनी व्यक्त केली.