08 August 2020

News Flash

आधी ‘लेस कॅश’, मग ‘कॅश लेस’ अर्थव्यवस्थेकडे देशाची वाटचाल- मोदी

मन की बातमधून मोदींचा देशवासीयांशी संवाद

मन की बातमधून पंतप्रधानांचा संवाद

नोटाबंदीबद्दल ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी कॅशलेस अर्थव्यवस्थेचा पुनरुच्चार केला. ‘अर्थव्यवस्था कॅशलेस होणे, हे आता लगेचच शक्य नाही. मात्र रोख रकमेवर कमीतकमी अवलंबून राहणे शक्य आहे. लोकांनी रोख रकमेचा कमीतकमी वापर करावा,’ असे आवाहन मोदींनी ‘मन की बात’मधून केले. याआधी पंजाबमधील भटिंडामध्ये सभेत बोलताना मोदींनी देश कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जात असल्याचे प्रतिपादन केले होते.

‘डिजीटल अर्थव्यवस्था कसे काम करते हे समजून घ्यायला हवे. कोणकोणत्या मार्गांनी बँक खाते आणि इंटरनेट बँकिंग केले जाऊ शकते, हे शिकायला हवे. तुमच्या फोनमधून विविध बँकांचे ऍप्स कसे वापरायचे, हे शिकून घ्यायला हवे. रोख रक्कम न वापरता व्यवसाय कसा करायचा, हे शिकायला हवे,’ असे म्हणत मोदींनी एकाचवेळी नोटाबंदी आणि डिजीटल इंडियावर भाष्य केले.

‘कार्ड पेमेंट, इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट करणे शिकायला हवे. कॅशलेस अर्थव्यवस्था सुरक्षित आहे. तुमच्याकडे देशाला डिजीटल बनवण्याची संधी आहे,’ असे आवाहन मोदींनी केले. पंतप्रधान मोदींनी यासाठी विशेषत: तरुणांना संबोधित केले. ‘तुमच्या पालकांना किंवा घरातील ज्येष्ठ ल्यक्तींना कदाचित याबद्दल माहिती नसेल. मात्र ट्रेनचे तिकीट ऑनलाईन बुक कसे करायचे, वस्तू ऑनलाइन कशा ऑर्डर करायच्या, याची माहिती तुम्हाला आहे. तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबीयांनाच नव्हे, तर छोट्या व्यावसायिकांदेखील डिजीटल पेमेंटचे फायदे सांगू शकता,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी तरुणांना कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

‘तुम्ही दररोज तुमच्या पाच शेजाऱ्यांना ऑनलाईन आणि डिजीटल पेमेंटची माहिती देऊ शकता. त्यांना कॅशलेस व्यवहार कसे करायचे, हे सांगू शकता. जर तुम्ही भाजी विक्रेत्याला किंवा हातगाडीवरुन सामान विकणाऱ्या रोख न वापरता व्यवहार करणे शिकवू शकलात, तर आपण नक्कीच कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करु शकतो,’ असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

‘आजकाल इंटरनेट आणि स्मार्टफोन सगळीकडेच पाहायला मिळतात. मोबाईलचा वापर करुन पैसे एकमेकांना पाठवणे, हे आता व्हॉट्सवरुन विनोद पाठवण्याइतके सोपे झाले आहे,’ असे म्हणत मोदींनी लोकांना कॅशलेस व्यवहारांकडे वळण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी बँक कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ‘बँक आणि पोस्टातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेला संयम आणि घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतरची परिस्थिती बँक कर्मचाऱ्यांनी उत्तमपणे हाताळली,’ असे मोदींनी म्हटले.

‘सर्व जग भारताकडे पाहते आहे. अर्थतज्ञ नोटाबंदीच्या निर्णयाचे परिणाम मोजण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या १२५ कोटी आहे. नोटाबंदीचा निर्णय या काळ्या पैशाविरोधात घेतलेला सर्वात मोठा निर्णय आहे,’ असेही मोदींनी यावेळी म्हटले.

पंतप्रधान मोदींनी लोकांना संयम पाळण्याचे आवाहन केले. ‘मी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना सर्वकाही सुरळीत होण्यासाठी ५० दिवसांचा अवधी लागेल, असे म्हटले होते. या कालावधीनंतर अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवन मार्गी लागेल,’ असे मोदींनी मन की बातमध्ये म्हटले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2016 12:48 pm

Web Title: less cash first cashless society next pm narendra modi appeals in mann ki baat radio address
Next Stories
1 पंजाब: पोलिसांच्या वेशात आलेल्या १० जणांचा नाभा तुरुंगावर हल्ला; एका दहशतवाद्यासह चार कैदी फरार
2 …म्हणून देशभरात मोठा चलनतुटवडा
3 पंतप्रधान मोदींचे भावूक होणे म्हणजे निव्वळ ब्लॅकमेलिंग- मायावती
Just Now!
X