पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वाराणसीमध्ये देव दिवाळीचा उत्सव साजरा केला. मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनही घेतलं. यावेळी छान रोषणाई करण्यात आली होती. पंतप्रधानांच्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नदीच्या किनाऱ्यावर उभे असून समोर मंदिरांना केलेली रोषणाई दिसून येत आहे. भगवान शंकराचे कौतुक करणारं गाणं मोठ्या आवाजात वाजत असल्याचे ऐकू येत असून मोदींनी या गाण्याच्या चालीवर ठेका धरल्याचे दिसून येत आहे. मात्र याच व्हिडीओवरुन आता काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी मोदींना टोला लगावला आहे.

मोदींच्या अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या या व्हिडीओसंदर्भात भाष्य करताना भाई जगताप यांनी मोदींचा उल्लेख शेठजी असा केला आहे. “शेठजी लायटिंग छान होती आणि तुमचा डान्स तर लाजवाबच,” असं जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हा टोला उपहासात्मक आहे हे दर्शवण्यासाठी जगताप यांनी संतपालेला इमोन्जीबरोबरच थम्ब्स डाऊन म्हणजेच डिस्लाइकचा इमोन्जीही ट्विटमध्ये वापरला आहे.

नक्की वाचा >> “अंबानींना टेलीकॉम, अदानींना एअरपोर्ट्स अन् शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदी है तो मुमकीन है”

या व्हिडीओवरुन मोदींवर टीका करणारे भाई जगताप हे काही पहिले नाते नाही. यापूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या आम आम आदमी पार्टीने या व्हिडिओमधील काही भाग एडीट करुन हा प्रकार म्हणजे २०२० मधील स्कॅम म्हणजेच घोटाळा आहे असा टोला लगावला होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्कॅम १९९२ चं म्युझिक देत हा व्हिडिओ एडीट करण्यात आला आहे. सॅमस्टर अशी कॅप्शन देऊन आपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या फोटोवर स्कॅम २०२० असं लिहिलं आहे. व्हिडिओमध्ये दिल्लीमधील शेतकरी आंदोलनात झालेल्या लाठीमार केल्याचे व्हिडीओ दिसत असून त्यासमोर मोदींनी ठेका धरल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> “…तर शेतकऱ्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं”; आंदोलकांबद्दल केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही मोदींनी ट्विट केलेला व्हिडीओ रिट्विट करुन त्यावर प्रतिक्रिया दिलीय. ‘तक् धिना धिन्! बाय बाय लाइट्स! भारत (देश) जळत असताना मोदींनी गाण्यावर ठेका धरलाय,’ अशी कॅप्शन भूषण यांनी या ट्विटला दिली आहे.

सोशल नेटवर्किंगवर मोदींनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओची आणि त्यांनी गाण्याच्या तालावर धरलेल्या ठेक्याची चांगलीच चर्चा रंगल्याचं चित्र पहायला मिळालं.