वन्यजीव उद्यानात सिंहाने पर्यटावर हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर होत आहे. व्हिडीओत सिंह पर्यटकाला ओढून नेताना दिसत आहे. पर्यटक हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, ही २८ एप्रिलची घटना आहे. दक्षिण आफ्रिकेतील मार्केल प्रेडेटर पार्कात ही धक्कादायक घटना घडली आहे. व्हिडीओत पर्यटक धोका पत्करत सिंहाच्या जवळ जाताना दिसत आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ला झालेली व्यक्ती उद्यानाची मालक असून, दुर्गंध येत असल्या कारणाने कुंपणाच्या आत जाऊन ते पाहणी करत होते.

जेव्हा व्यक्ती कुंपण ओलांडून आत जाते तेव्हा सिंह विरुद्ध दिशेला तोंड करुन चालत होता. मात्र अचानक तो वळतो आणि पाठलाग सुरु करतो. सिंहाने अचानक पाठलाग सुरु केल्याने पर्यटकही धाव घेतो. पर्यटक कुंपणाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच सिंहाच्या तावडीत सापडतो आणि सिंह त्याला फरफटत नेतो.

यावेळी तिथे उपस्थित इतर पर्यटक मदतीसाठी आरडाओरड करताना ऐकायला येत आहे. सिंह आवाज ऐकून थांबतो मात्र पुन्हा एकदा फरफटत नेण्यास सुरुवात करतो. गोळीबार केल्यानंतर अखेर घाबरुन सिंह पळ काढतो आणि पर्यटकाची सुटका केली जाते. सिंहाच्या हल्ल्यात पर्यटक गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे. दरम्यान सिंहाला पिजऱ्यात बंद करण्यात आलेलं आहे.