लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउन कधी संपणार याबद्दल काहीच माहिती नसल्याने आणि दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक स्थलांतरित मजूर मिळेल त्या मार्गाने प्रवास करत आपलं घर गाठत आहेत. यादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी पहायला मिळत असताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत भुकेने व्याकूळ झालेली व्यक्ती रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचं मांस खाताना दिसत आहे.

विचलित करणारा हा व्हिडीओ राजस्थानमधील शाहपुरा येथील असल्याचा दावा केला जात आहे. दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर हा व्हि़डीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ १८ मे रोजी जयपूरमधील प्रद्युमन सिंह नरुका यांनी युट्यूबवर अपलोड केला आहे. प्रद्युमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण दिल्लीला जात असताना या व्यक्तीला शाहपुरा येथे रस्त्यावर जनावराचं मांस खाताना पाहिलं. यानंतर प्रद्युमन यांनी त्या व्यक्तीला मदत करत अन्न आणि पाणी दिलं.

आणखी वाचा- स्थलांतरित मजुरांचा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता – नीती आयोग

व्हिडीओत प्रद्युमन बोलताना दिसत आहे की, ही व्यक्ती रस्त्यावर मृत पडलेल्या कुत्र्याचं मांस खात आहे. यानंतर ते त्या व्यक्तीला आवाज देत, खाण्यासाठी अन्न नाही का ? अशी विचारणा करत ते खाल्ल्याने मृत्यू होईल ? असंही सांगत आहेत. यानंतर प्रद्युमन त्या व्यक्तीला रस्त्याच्या बाजूला थांबण्यास सांगतात आणि अन्न-पाणी देऊन मदत करतात. अन्न मिळाल्यानंतर ती व्यक्तीही भुकेली असल्याने लगेच खाण्यास सुरुवात करते. यावेळी प्रद्युमन त्याची चौकशी करत मदत करण्याचं आश्वासन देतात. प्रद्युमन यांनी व्हिडीओमध्ये लोकांना असं कोणीही गरजू व्यक्ती दिसली तर मदत करा असं आवाहनही केलं आहे.