उत्तर प्रदेशचे लोकायुक्त वीरेंद्र सिंह यांची नेमणूक झाली असली तरी त्यांचा शपथविधी लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश थेट सर्वोच्च न्यायालयाने काढला होता. सर्वोच्च न्यायालयात आता सिंह यांच्या नियुक्तीवर आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या याचिकेचा निकाल लागेपर्यंत शपथविधी होणार नाही, असे राज्य सरकारने न्यायालयाला कळवले आहे. सुटीच्या दिवशी न्या. ए.के.गोयल व न्या. उदय लळित यांनी वीरेंद्र सिंह यांच्या नावाला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आक्षेप घेतला असताना त्यांचे नाव पाच संभाव्य नावांत कसे आले याबाबत प्रश्न उपस्थित केले. सरकारने त्याबाबत काहीच भूमिका मांडली नाही व उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महाधिवक्ता गौरव भाटिया यांनी सरकारच्या वतीने उद्या शपथविधी होणार नाही असे लेखी दिले. वीरेंद्र सिंह यांच्या नियुक्तीला सच्चिदानंद गुप्ता यांनी आव्हान दिले व सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाने सिंह यांच्या नावाबाबत काय टिप्पणी केली हे दडवून ठेवले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल झाल्याचा आरोप आहे.