अमेरिकेतील डल्लास येथे एका नाल्यात मृतावस्थेत सापडलेल्या शेरीन मॅथ्यूज या तीन वर्षांच्या मुलीच्या सावत्र आईवडिलांचे तसेच त्यांचे नातेवाईक व मित्र यांचे ओव्हरसीज सिटीझनशीप ऑफ इंडिया म्हणजे ‘ओसीआय’ नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. ते प्रकरण गेल्या वर्षी २२ ऑक्टोबरला घडले होते. भारतीय अमेरिकी आईवडिलांनी ती मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर दोन आठवडय़ांनी तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नाल्यात सापडला होता.

ह्य़ूस्टन येथील महावाणिज्यदूत अनुपम राय रे यांनी सांगितले, की भारताने वेस्ली मॅथ्यूज व त्याची पत्नी सिनी यांचे ओसीआय नागरिकत्व रद्द केले आहे. सध्या ते तुरुंगात आहेत. त्या जोडप्याचे काही नातेवाईक व सहकाऱ्यांचे ओसीआय नागरिकत्व रद्द करण्यात आले आहे. मनोज एन अब्राहम, निसी टी. अब्राहम हे मॅथ्यूज कुटुंबाचे मित्र असून त्यांना ओसीआय नागरिकत्व रद्द करण्यात येत असल्याच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्याला त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

वेस्लीचे आईवडीलही या यादीत असून रे यांनी पीटीआयला सांगितले, की भारताने त्या मुलीचा मृत्यू प्रकरणी लोक हितार्थ हे पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या काळ्या यादीत त्यांची नावे टाकण्यात येतील.