देशाच्या सुरक्षेबाबतची महत्त्वाची माहिती पाकिस्तानच्या इंटर सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे आयएसआय या संस्थेला दिल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाला नोईडात अटक केली आहे. अच्युतानंद मिश्रा हा मध्य प्रदेशच्या रेवा जिल्ह्य़ातील असून तो हनीट्रॅपमध्ये अडकला व त्याने महत्त्वाची माहिती आयएसआयला दिली होती. संरक्षणविषयक वार्ताहर असल्याचा बहाणा करून एक महिला आली असता तिला त्याने पोलीस अकादमी, प्रशिक्षण केंद्र याबाबतची माहिती दिली. मिश्रा हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.

एटीएस व बीएसएफ यांच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी व मंगळवारी नोईडात त्याचे जाबजबाब घेतले होते. अधिकृत गोपनीयता कायद्यानुसार त्याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. त्याला २००६ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती करण्यात आले होते व तो २०१६ पासून त्या महिलेशी संपर्कात होता. कालांतराने त्याने तिला सगळी माहिती दिली होती. त्यात सीमा सुरक्षा दलाच्या छावण्यांची छायाचित्रेही होती.

नंतर त्याने पाकिस्तानात नोंदणी असलेल्या फोन क्र मांकावर या महिलेशी व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग सुरू केले होते. धर्मातर व काश्मीरबाबत त्याचे मतपरिवर्तन करण्यात यश आल्याचे संभाषणातून दिसून आले होते. त्याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी मोबाईल नंबर होता. तो पाकिस्तानी दोस्त नावाने सेव्ह केला होता. हा क्रमांक जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

मिश्रा याने गुन्हा कबूल केला असून त्याच्या विरोधात अनेक सायबर पुरावे सापडले अ हेत. त्याने पाठवलेली चित्रे  व व्हिडिओ ताब्यात घेण्यात आली असून गोपनीयता कायदा कलम ३,४,५,९, भादंवि कलम १२१ ए तर माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ डी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला लखनौ येथील न्यायालयात हजर केले  जाणार आहे.

ही माहिती देण्याच्या बदल्यात त्याला पैसे मिळत होते का हे पाहण्यासाठी त्याच्या खात्यांची चौकशी सुरू आहे. त्याने नेमकी काय माहिती पाकिस्तानी महिलेला दिली हे अजून समजलेले नाही. उत्तर प्रदेश एटीएसचे अधिकारी सतत सीमा सुरक्षा दल अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. पाकिस्तानची आयएसआय ही संस्था सुंदर महिलांच्या मार्फत लष्कर व निमलष्करी दलातील जवानांना जाळ्यात ओढून माहिती मिळवत असल्याचे समजले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.