लंडन : मुलांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर ते सहा दिवसात बरे होतात. काहींमध्ये लक्षणे चार आठवडे दिसण्याची शक्यता असते पण तसे फार मुलांमध्ये होत नाही, ती शक्यता दुर्मीळ असते, असे लॅन्सेट चाईल्ड अँड अ‍ॅडोलसंट हेल्थ नियतकालिकाने म्हटले आहे.

स्मार्टफोन अ‍ॅपच्या माध्यमातून पालक आणि मुलांची काळजी घेणारे लोक यांनी दिलेल्या माहितीनुसार हा संशोधन निबंध तयार करण्यात आला आहे. शाळकरी वयातील मुलांमध्ये करोनाची लक्षणे कशा प्रकारे व किती काळ दिसतात याबाबतचा हा पहिलाच सविस्तर अभ्यास आहे. किंग्ज कॉलेज, लंडन या संस्थेच्या प्राध्यापक एम्मा डंकन यांनी म्हटले आहे, की करोनाची लक्षणे जास्त काळ दिसलेल्या मुलांची संख्या कमी आहे. फार कमी मुलांमध्ये हा आजार जास्त काळ लक्षणे दाखवतो. मुलांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अनुभव यातून हे स्पष्ट होत आहे. काही मुलांमध्ये करोनाची लक्षणे जास्त काळ म्हणजे चार आठवड्यांपर्यंत दिसली. पण लक्षणांचा हा कालावधी जास्त असण्याची शक्यता कमी असते.