भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या २८ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध ‘मेडिसन स्क्वेअर’ येथे होणाऱया स्वागत कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी चक्क लॉटरी पद्धत वापरण्याचा निर्णय या कार्यक्रमाच्या आयोजकांनी केला आहे.
अमेरिकेतील ‘इंडियन-अमेरिकन कम्युनिटी फाऊंडेशन’ ही संस्था हा कार्यक्रम आयोजित करत आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांच्या अनेक संस्थांच्या समन्वयातूनही संस्था स्थापन करण्यात आली आहे. मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेच्या कानाकोपऱयातून सोमवारी रात्रीपर्यंत २० हजार अर्ज आले होते. यांतील काही अर्ज हे अमेरिकेच्या अलास्का, हवाई यांसारख्या दुर्गम भागातूनही आले आहेत.  
या कार्यक्रमाला मोफत प्रवेशिका देण्याची सोय करण्यात आली आहे परंतु, मेडिसन स्वेअर गार्डनची क्षमता ही केवळ २० हजार नागरिकांची आहे. तसेच आपल्या उपस्थितीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. यामुळे उपस्थितीसाठी इच्छुकांचा आकडा २० हजारांहून वर गेला आहे. यापार्श्वभूमीवर या कार्यक्रमाच्या तिकीटांसाटी लॉटरी पद्धत वापरण्यात येईल असे निवदेन संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.