देशभरात व्हॅलेंटाइन डेची तयारी सुरु असतानाच लखनौ विद्यापीठाचा एक निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘व्हॅलेंटाइन डेला विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात फिरु नये, असे पत्रकच विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर  कारवाई केली जाईल अशी तंबीच विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

लखनौ विद्यापीठाच्या वतीने १० फेब्रुवारी रोजी एक पत्रक जारी करण्यात आले आहे. ‘गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी पाश्चिमात्य संस्कृतीपासून प्रभावित होऊन १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा करत असल्याचे समोर आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी विद्यापीठात महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसर बंद राहणार आहे. त्या दिवशी कोणतेही अतिरिक्त वर्ग किंवा प्रयोग परीक्षा होणार नाही. त्या दिवशी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी १४ फेब्रुवारीला विद्यापीठाच्या आवारात येऊ नये. पालकांनीही त्यांच्या मुलांना विद्यापीठाच्या आवारात पाठवू नये. जर एखादा मुलगा किंवा मुलगी विद्यापीठाच्या आवारात फिरताना दिसली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल’, असे या पत्रकात म्हटले आहे.

विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्यापीठाने असा निर्णय घेतला असावा असा दावा केला जात आहे. तर विद्यापीठाचे परिपत्रक वाचून त्यांची मानसिकता दिसते, असे काही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.