याच धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञानाची नवी गाडी आणण्याचा रेल्वेचा प्रयत्न

मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर सर्वाधिक वेगवान अशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची टॅल्गो गाडी तांत्रिक कारणास्तव चालविणे शक्य नसल्याने तिच्याऐवजी १८ डब्यांची भारतीय बनावटीची गाडी चालविण्याचा रेल्वेचा विचार आहे. या गाडीची बांधणी रेल्वेच्या चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यात केली जाणार आहे. यामुळे मुंबई-दिल्ली मार्गावरील रेल्वेचा प्रवास तीन ते चार तासांनी कमी होईल, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.

मुंबई ते दिल्ली हा सर्वाधिक व्यस्त व महत्त्वाचा रेल्वे मार्ग मानला जातो. या मार्गावरील प्रवासाकरिता लागणारा वेळ वेगवान व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गाडय़ा चालवून कमी करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यासाठी ऑगस्ट, २०१६ मध्ये वेगवान अशा टॅल्गो गाडीची तीन वेळा चाचणी या मार्गावर घेण्यात आली. ताशी १६० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या गाडीने मुंबई ते दिल्लीदरम्यानचा १६ तासांचा प्रवास १२ ते १३ तासांत पार केला. मात्र ही टॅल्गो चालविण्यासाठी काही तांत्रिक अडचण येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प मागे पडला असून त्याला पर्याय म्हणून टॅल्गोसारखीच ‘ट्रेन सेट’ प्रकारातील लांब पल्ल्याची गाडी बनविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ट्रेन सेटमधे लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे डबे एकमेकांना कायमस्वरूपी जोडलेले असतात, तर त्याच्या मागे-पुढे इंजिन जोडून या गाडीला वेग दिला जातो. गाडीला अधिक वेग यावा यासाठी प्रत्येक डब्याच्या खालच्या बाजूला मोटर कोच जोडण्यात येईल.

टॅल्गो मागे का पडली?

टॅल्गोतही अशाच प्रकारचा ‘ट्रेन सेट’ आहे. टॅल्गोची चाचणी २०१६ मध्ये यशस्वी झाली. मात्र तरीही ती सेवेत येऊ  शकली नाही. टॅल्गो तयार करणाऱ्या कंपनीकडून ती चाचणीसाठी देण्यात आली होती. मात्र निविदा न काढताच टॅल्गोला काम देणे योग्य नसल्याने टॅल्गो सेवेत येऊ  शकली नाही, असे सांगितले जाते. दुसरे एक कारण तांत्रिक अडचणींचेही दिले जाते. त्यामुळे हा प्रकल्प मागे पडला आहे. आयसीएफकडून (इंटिग्रल कोच फॅक्टरी) टॅल्गोच्या धर्तीवरच नवी गाडी तयार करण्यात येणार आहे. ती १८ डब्यांची असेल. यासाठी निविदा काढण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे मुंबई ते दिल्ली मार्गावरील प्रवास वेळही कमी होण्यासाठी मदत मिळेल.

ट्रेन सेट म्हणजे काय?

ट्रेन सेट हे परदेशी तंत्रज्ञान आहे. यात सर्व डबे कायमचे एकमेकांना जोडलेले असतात. त्यामुळे गाडय़ांचा वेग वाढण्यास मदत मिळते.

टॅल्गो ही ट्रेन सेट प्रकारातील लांब पल्ल्याची गाडी होती आणि त्याची यशस्वी चाचणी झाल्यानंतर अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला. त्याच धर्तीवर आयसीएफमध्ये १८ डब्यांची अत्याधुनिक गाडी बनविण्यात येईल. त्यासाठी निविदा काढण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे.   – नितीन चौधरी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, उत्तर रेल्वे