मध्य प्रदेशमधील सतना येथील गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत, पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयसाठी काम करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करत आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस अधिक्षक रियाज इकबाल यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. या पाच आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या १३ मोबाईलमध्ये काही पाकिस्तानी नंबर आढळले आहेत, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे बलराम सिंह, भागवेंद्र सिंह, सुनील सिंह, शुभम तिवारी ही आहेत. पाचव्या आरोपीचे नाव समजू शकलेले नाही. यामधील बलराम सिंह याला या अगोदर देखील भोपाळच्या दहशतवाद विरोधी पथकाने २०१७ मध्ये अटक केली होती. तर भागवेंद्र सिंह यास इंदौरच्या एटीएसकडून अटक करण्यात आली होती. याशिवाय सुनील सिंह हो २०१४ पासून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता, मात्र एटीएस त्याला आतापर्यंत पकडू शकलेली नव्हती.

गुन्हे शाखेला आरोपींकडे आढळून आलेल्या फोन आणि लॅपटॉपमधून १३ पाकिस्तानी नंबर मिळाले आहेत. या नंबरद्वारे ते दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्यांशी व्हिडीओ कॉलिंग, मेसेंजर कॉल आणि व्हॉट्स अपवर चॅट करत होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बलराम हा अटकेनंतर जामीनावर बाहेर आला होता व त्याने पुन्हा आपले गुन्हेगारी कार्य सुरू केले होते. हे आरोपी पाकिस्तानमधील आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करत असत, त्यानंतर आपल्या खात्यात पैसे जमा करून ते दहशतवादी कारवायांसाठी पाठवत. पोलीस या सर्व आरोपींची कसून चौकशी करत आहेत.